पुणे I झुंज न्यूज : औरंगाबाद शहरात 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून गेल्या एक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. तर सभेला एक दिवस शिल्लक राहिला असताना शिवसेनेकडून आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. ज्यात पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच ‘हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर’ अशी हाक शिवसैनिकांना देण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभेची चर्चा होत आहे. ज्या मैदानावर राज यांची सभा पार पडली त्याच मैदानावर उद्धव यांची सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या सभेला सुद्धा महत्व आले असून, या सभेत ते काय बोलणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
“उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता सभेच्या एक दिवस आधी सुद्धा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचा भाषण दाखवण्यात आला आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर…सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय ? हे संभाजीनगर सांगणार, भगवी पताका फडकणार हिंदुत्वाचा झेंडा उंच राहणार, प्रखर हिंदुत्वासाठी भगव्या एल्गारासाठी हिंदुत्वाचा नारा दुमदुमणार सर्वत्र भगवे वादळ घुमणार, शिवबंधन दृढ राहणार हिंदुत्व चेतवणार,हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर…असे टीझरमध्ये म्हटल आहे.
शहरभरात होर्डिंग
उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेनेचे सर्वच स्थानिक नेते कामाला लागले आहे. तर शहरातील सर्वच महत्वाच्या चौकात, जालना रोड आणि सभास्थळाच्या भागात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे लावण्यात आले. त्यामुळे शहर भगवेमय झालं असल्याचं दिसत आहे. सोबतच महिला आघाडी,युवसेना यांच्यासह शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.