मुंबई I झुंज न्यूज : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतयांनी याच मुद्यावरून सामनाच्या रोकठोकमधून भाजपवर निशाणा साधला आहे. संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात व त्या आगीवर राजकीय भाकऱ्या शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते ?, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सामनाच्या रोकठोक अग्रलेखात राऊत म्हणाले की, नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनासीमा जिल्हय़ाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडक कोनासीमा जिल्हा असे नाव केले. त्यांनतर या संपूर्ण भागात हिंसाचार व जाळपोळ सुरू आहे. एखाद्या शहराचे नामांतर करण्याचे अधिकार केंद्राचे असतात. प्रस्ताव केंद्राकडे जातो. त्यानुसार कोनासीमा जिल्हय़ाचे नामांतर डॉ. आंबेडकरांच्या नावे झाले. मग विरोध का ? औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी जुनीच आहे. त्यावर केंद्र सरकार का निर्णय घेत नाही ? की संभाजीनगरमध्येही नामांतरावरून दंगली व्हाव्यात व त्या आगीवर राजकीय भाकऱ्या शेकाव्यात अशी कुणाची इच्छा दिसते ? असं राऊत म्हणाले.
भाजपने धाडस दाखवावे…
तर यावेळी राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उकरून काढला आहे. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा ठरत असेल तर भाजपने कुदळ-फावडी घेऊन त्या कबरीची बाबरी करण्याचे धाडस दाखवावे, पण सत्य असे की, औरंगजेबाची कबर भारत सरकारच्याच पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येते व आता ही कबर पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय पुरातत्त्व खात्याने घेतला आहे. यावर भाजप मंडळाचे काय म्हणणे आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मोदींवर निशाणा…
सामनाच्या रोकठोकमधून राऊत यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका केली. भारतात सध्या सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीचे आहे. बेरोजगारी दर 24 टक्क्यांवर पोहोचला असून तो जगात सर्वाधिक आहे, असे कौशिक यांचे म्हणणे आहे. गेल्या सात वर्षांत देशातले उद्योग बंद पडले, नवे उद्योग आले नाहीत. देशातले वातावरण उद्योगांसाठी बरे नाही. सरकार त्याच्या एखाददुसऱया लाडक्या उद्योगपतीसाठी पायघडय़ा घालत आहे.
जगात सर्वाधिक बेरोजगार असलेल्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतात व त्या नात्याने ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वावरतात तेव्हा आश्चर्य वाटते. जपानमधील ‘क्वॉड’ देशांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेते एकत्र आले. हे सर्व नेते चालत आहेत व त्यांच्या सगळय़ात पुढे आप पंतप्रधान मोदी असल्याचे छायाचित्र हिंदुस्थानात प्रसिद्ध झाले, ते सुखावणारे आहे, पण त्याच जागतिक व्यासपीठावर आपली बेरोजगारी सगळय़ात जास्त आहे त्याचे काय? असा खोचक टोला राऊत यांनी मोदींना लगावला.