पिंपरी I झुंज न्यूज : वर्किंग वूमन वर आधारित असलेला व महिला सशक्तिकरणाचा सामाजिक संदेश देणारा बहुचर्चित “भावना” लघुपटाला नुकताच रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे “बेस्ट वूमन शॉर्ट फिल्म” म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच गोल्डन ईगल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये देखील “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” म्हणून “भावना” लघुपटाला गौरविण्यात आले आहे.
सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पिंपरी-चिंचवड शहरातील हा एकमेव लघुपट ठरला आहे. याचीच दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात “भावना” लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्या सह लघुपटातील सर्वच कलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता घुले, अभिनेत्री प्रज्ञा पाटील, डॉ श्रीमंत पाटील, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष म्हात्रे, अभिनेत्री पिया कोसुंबकर, अभिनेत्री पूजा वाघ, कलाकार प्रसाद खैरे, रोहित पवार, चिराग चौधरी, बालकलाकार अर्णव चावक, भारत एक्सप्रेस चे पत्रकार जमीर सय्यद, प्रदीप म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
“भावना” हा लघुपट ९ जानेवारी २०२२ रोजी “रेडबड मोशन पिक्चर्स” या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाला होता. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. या लघुपटला याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. तर पोस्ट प्रोडक्शन (संपादन) पिंपरी चिंचडमधील एपीएच स्टुडिओच्या संचालिका व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे.