अ. भा. म. नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचा १७ वा वर्धापन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे I झुंज न्यूज : राजकारणातले पद कधीही जाऊ शकते, पण सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा १७ वा वर्धापन दिन सेवा धाम ग्रंथालय येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात तळेगाव शाखेच्या बालनाट्य शिबिरार्थींनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने झाली. यावेळी संतसाहित्य आणि लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, वृषालीराजे दाभाडे सरकार, अ.भा.म.ना.प.तळेगाव शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, प्रभाकर ओव्हाळ आदी उपस्थित होते.
यंदाचा कलागौरव पुरस्कार सिने – नाट्य अभिनेते माधव अभ्यंकर यांना, तर तळेगावच्या सांस्कृतिक चळवळीचे नाव जगाच्या रंगभूमीवर गाजविणाऱ्या कलापिनीचे विश्वस्त व ध्यास पुरुष डॉ. अनंत शं. परांजपे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच नाट्य निर्माते संतोष साखरे यांना, लेखिका व रंगकर्मी डॉ. विनया केसकर, नृत्य अभ्यासक, रंगकर्मी व सृजन नृत्यालयाच्या संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी या कलाकारांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
डॉ. रामचंद्र देखणे यांनी नाटक हा पाचवा वेद आहे, असे सांगून डॉ. अनंत परांजपे यांना जीवन गौरव पुरस्कार योग्य वेळी देऊन त्यांच्या योगदानाचा उचित गौरव केल्याबद्दल तळेगाव नाट्य परिषदेचे कौतुक केले.
तळेगाव आणि मावळ परिसरातील सांस्कृतिक चळवळीत योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी आणि त्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी नाट्य परिषदेची तळेगाव शाखा कायम कटिबद्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी सांगितले.
या वर्षी तळेगावच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, माझे वडील कै. डॉ.शं.वा. परांजपे यांनी रुजवलेल्या तळेगावातील नाट्य चळवळीचा, कलापिनीचा गौरव आहे, असे डॉ. परांजपे यांनी सांगितले.
अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आपण तळेगावकर झालो असल्याचे सांगून यापुढे तळेगाव आणि कलापिनीच्या नाट्य चळवळीत सक्रीय सहभाग घेणार असल्याचे सांगितले.
डॉ.मीनल कुलकर्णी, डॉ.विनया केसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका माधुरी कुलकर्णी-ढमाले यांनी, तर आभार नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य सुरेश दाभाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष साखरे, डॉ. मिलिंद निकम, सुरेश दाभाडे, मिथिल धोत्रे, राजेश बारणे, नितीन शहा, संग्राम जगताप, प्रसाद मुंगी, भरत छाजेड, क्षिप्रसाधन भरड, नयना डोळस, विवेक क्षीरसागर, सुमेर नंदेश्वर, विश्वास देशपांडे यांनी मेहनत घेतली.