पुणे I झुंज न्यूज : रसपूर्ण आणि भावपूर्ण शब्दांचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे कविता. वैदिक काळात कविता सनातनी धर्माशी आणि कर्मकांडाशी निगडीत होती. असे मत प्रा. डॉ. मोहन लोंढे यांनी व्यक्त केले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनातील साहित्य सम्राट पुणे या संस्थेच्या १३१व्या कविसंमेलनाच्या सत्रात अध्यक्षीय भाषणात लोंढे बोलत होते.
ते पुढे म्हणाले आधुनिक काळात कवी नामदेवराव ढसाळ आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे कवी निर्माण झाले. महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजच्या कवींनी समकालीन वास्तवाला भेदण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शोषणाच्या टोकाचे चित्रण झाले पाहिजे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार, प्रथा,अंधश्रध्दा, ग्रामीण,शहरी आणि स्त्रीवादी आशा विचारांचे वास्तववादी अफाट साहित्य निर्माण केले.
हे कविसंमेलन ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले नाट्यगृह गंजपेठ पुणे येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन २०२२, येथील राजर्षी शाहू महराज साहित्य नगरी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपीठावर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संमेलन स्वागताध्यक्ष अविनाश बागवे, सोपान खुडे, सचिन बागडे, हनुमंत साठे आदी मान्यवर उपस्थित होते. कविसंमेलनात दर्जेदार तीस कवींनी सहभाग घेतला. त्यांच्या समवेत मंचावर कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मोहन लोंढे आणि साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ होते. कविसंमेलनाचे निवेदन रानकवी जगदीप वनाशिव यांनी केले तर आभार अनिल हातागळे यांनी मानले.