मुंबई I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी केतकी चितळेवर चहुबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट शेअर केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढल्या आहेत. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट तिने आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी केतकी विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट
केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. अॅड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट असून ती तिनं आपल्या वॉलवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली आहे. यामध्ये “ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक” असे शब्द वापरण्यात आले आहेत.
अमोल कोल्हेंनी केतकी चितळेवर केली टीका
केतकीवर चहुबाजूने टीकेची झोड उठवली असतानाच, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. साहेबांबद्दल द्वेषानं गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध, असं ट्विट कोल्हे यांनी केलं आहे.
शरद पवार यांच्याविरोधातील आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेनं फेसबुकवर केली आहे. नितीन भावे या व्यक्तीच्या नावाने असलेली पोस्ट तिने शेअर केल्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. अमोल कोल्हेंनीही संताप व्यक्त केला आहे. साहेबांबद्दल द्वेषानं गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध असं कोल्हे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत शरद पवार यांचं मोलाचं योगदान आहे, याकडेही कोल्हे यांनी या पोस्टमधून लक्ष वेधलं. विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा, अशा शब्दांतही कोल्हे यांनी कान टोचले आहेत.
फेसबुक पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल
इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं म्हणजे तिच्यात किती ठासून विकृती भरली आहे, याचा अंदाज येतोय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. केतकीला जास्त महत्त्व देऊ नका. तिला अभिनय क्षेत्रात काम नसल्याने अशा वादग्रस्त पोस्ट करुन तिला चर्चेत यायचं असतं, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. आपलं वय किती, आपण बोलतो किती, आपल्या योग्यतेनुसार आपण बोलावं, आपली लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलण्याची, असं म्हणत एका नेटकऱ्याने केतकीला सुनावलं आहे.