मुंबई I झुंज न्यूज : हनुमान चालिसा वाचण्यावरुन सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज ते दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटीला पोहोचले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षात केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आलं. आता कुणालातरी ओठाखाली रक्त आलं आहे, त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत आहेत. यांना काही ना काम ना धंदा, अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
राऊत यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट? महाराष्ट्रात या लोकांना कामधंदा नाही. तुमचे काही प्रश्न असतील कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भात तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटीला हवं. उत्तर प्रदेशातील घटनांबाबत गृहमंत्र्यांना कोणी माहिती देत असले तर त्यांनी माहिती घेतली असेल. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा, ही सगळी ढोंगं चालली आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, दोन-चार लोकं जातात. दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. महाराष्ट्राच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे, आणि हे षडयंत्र असंच सुरु राहिलं तर ह्या महाराष्ट्रद्रोह्यांना लोकं जागेजागी चपला मारतील, असं ते म्हणाले.
संजय पांडे यांच्या किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, संजय पांडे सक्षम, निष्पक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांवर असे आरोप करु नये.