महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या या महाघोटाळ्याची चौकशी करावी
पुणे I झुंज न्यूज : पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली विक्रांत जहाज वाचविण्याच्या बहाण्याने किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपये भाजपच्या बँक अकाउंटला जमा केले. अगदी त्याचप्रमाणे राममंदिराच्या बांधकामासाठी भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या संघटनांनी गोळा केलेली रक्कम भाजपने निवडणूक प्रचारासाठी तर वापरली नाही ना ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे.
राममंदिर झाले पाहिजे, ही अनेक भारतीयांची इच्छा आहे. रामंदिराच्या बांधकामासाठी समाजाच्या विविध स्तरातून निधी स्वरूपात देणगी देण्यात आली. मात्र, रामंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी भाजपच्या अनेक संघटना एकवटल्या होत्या. अगदी ग्रामीण भागातील संघटनांपासून मोठमोठ्या शहरांतील भाजपच्या संघटनांनी दारोदार निधी गोळा केला. हा निधी हजार कोटींच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वस्तुतः जमा झालेल्या एवढ्या मोठ्या निधीतील किती निधी भाजपने राममंदिर निर्माण समितीकडे जमा केला ? याची आकडेवारी अद्याप जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे भाजपचा हा महाघोटाळा असण्याची शक्यता आहे. याची महाविकास आघाडी सरकारने चौकशी करावी. जेणेकरून भाजपचा आणखी एक खरा चेहरा समोर येईल.
ज्याप्रमाणे विक्रांत जहाज वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला. मात्र, तो राजभवनला जमाच केला नाही, हे वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले. दुसरे असे की कोरोनाच्या नावाखाली उघडलेल्या नवीन पीएम केअर फंडामध्ये किती रुपये जमा झाले, किती खर्च झाले ? याचा तपशील दिलेला नाही. याबरोबरच राममंदिराच्या बांधकामासाठी किती निधी गोळा झाला आणि किती निधी राममंदिर निर्माण समितीकडे जमा केला, यामध्ये सुस्पष्टता दिसत नाही. हा पैसा निवडणुकांसाठी वापरल्याची शंका व्यक्त करण्यास वाव आहे. त्यामुळे भाजपच्या छोट्या मोठ्या संघटनांनी मिळून महाराष्ट्रातून किती निधी गोळा केला ? याची महाविकास आघाडी सरकारने चौकशी करावी. जेणेकरून भाजपचा आणखी एक खरा चेहरा समोर येईल.