पुणे | झुंज न्यूज : प्रतिबिंब महाराष्ट्राचं, ग्रामीण विकासाचं ! हे ब्रीद घेवून राज्यभर कार्यरत ग्रामगौरव सामाजिक संस्थेच्या वतीने ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय पहिल्या ग्राम महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील कृषि महाविद्यालयाच्या सिंचननगर प्रांगणावर येत्या १२ ते १६ मे दरम्यान पाच दिवसीय या महोत्सवात राज्यातील सर्व ग्रामपंचायत स्तराच्या पदाधिकाऱ्यांची राज्याच्या महसुली विभागाप्रमाणे जिल्हानिहाय उपस्थिती राहील.
दैंनदिन पहिल्या सत्रात ‘भन्नाट गावाच्या भन्नाट गोष्टी’ म्हणून राज्यात लोकसहभागातून विविध क्षेत्रात काम केलेल्या गावांच्या यशोगाथांची चलचित्रफीत दाखवून तसेच यशदा व इतर संस्थाकडून ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या उमेदवार, उद्योग- व्यावसायिक व रोजगार – स्वयंरोजगारात असणाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र देणाऱ्या नामवंत व्याख्यात्यांचे दररोज ‘यशाचा टप्पा गाठताना’ विषयावर प्रेरणादायी परिसंवाद होतील.
दरम्यान, पाचही दिवस दररोज सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, इतिहास, शेती-माती व ग्रामीण लोकधारा ठळकपणे मांडणारा २०० लोककलावंताच्या समूहाने सादर केलेला ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ हा मुख्य कार्यक्रम सादर केला जाईल. राज्यस्तरीय या ग्राममहोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यभरातील दर्शकांना विशेषत: पुणेकरांना राज्यातील सर्व भागातील खाद्य संस्कृती, कंझ्युमर शॉपी व बोलीभाषेचे आदान प्रदान सुद्धा उपलब्ध राहणार आहे.
ग्रामगौरव उत्कृष्ठता महासन्मान पुरस्कारासाठी आवाहन
लोकोत्सव महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय पहिल्या ग्राममहोत्सवाचे निमित्त साधून राज्यभरात अभिनव तसेच हटके काम केलेल्या, लोकसहभागातून विकास साधलेल्या सरपंचांना, निव्वळ महिलांच्या हाती कारभार असलेल्या ग्रामपंचायती तसेच प्रेरणादायी व्यक्ती, शैक्षणिक, युवक व क्रिडा, सामाजिक, सहकारी, अध्यात्मिक अशा स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रात कार्यरत संघटना, उद्योग-व्यवसाय समूह, महिला व कृषि बचतगट तसेच लोकाभिमुख कार्य करणाऱ्या पत्रकार आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र व राज्याचे मंत्री, महनीय व्यक्तिमत्व यांच्या शुभहस्ते ग्रामगौरव उत्कृष्ठता महासन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी पुरस्कारासाठी आपापल्या कार्याचे प्रस्ताव info.mahalokotsav@gmail.com या मेलवर पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी संस्थेच्या पुणे कार्यालयात 25440150 /25440155 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन ग्रामगौरव संस्थेच्या अध्यक्षा कु. धनश्री विवेक ठाकरे, कार्यक्रम संयोजक श्रीमती करुणा पाटील व इव्हेंट हेड विश्वजित पाटील यांनी केले आहे.