पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश कांबळे, उपाध्यक्षपदी सुमित टूंगलाइट, तर पुणे शहराध्यक्षपदी आनंद गडपोल
पुणे I झुंज न्यूज : मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोकण या ठिकाणी पत्रकार उत्कर्ष समिती कार्यरत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातही उत्कर्ष समितीचा विस्तार करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पत्रकार उत्कर्ष समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामभाऊ जाधव यांच्या सोबतच पत्रकार उत्कर्ष समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश कांबळे यांची, उपाध्यक्षपदी सुमित टूंगलाइट यांची, तर पुणे शहर अध्यक्षपदी आनंद गडपोल यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल येथे झालेल्या बैठकीत उत्कर्ष समितिचे संस्थापक डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांना शासनाकडून सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी, तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले रोखणे, अन्याय, अत्याचारा विरोधात वाचा फोडण्याचे काम पत्रकार उत्कर्ष समिती करीत आहे. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्याचे काम ही समिती प्रयत्न करीत आहे. तसेच पत्रकारांना आरोग्य विम्याचे कवच मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम आणि घटनात्मक कार्याबाबतही वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.
आपल्या नियुक्तीनंतर बोलताना रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की राज्य सरकारने पत्रकारांसाठी घरे मिळावीत, यासाठी स्वतंत्र योजना राबवावी. प्रत्येक पत्रकाराला स्वतःचे हक्काचे घर असावे. शासनाने पत्रकारांसाठी पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहर परिसरात भूखंड उपलब्ध करून द्यावा, यासाठी प्रयत्नशील आहे.
“राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी संयुक्तपणे पत्रकारांच्या घरांसाठी भूखंड उपलब्ध करून दिल्यास अनेक पत्रकारांना हक्काची घरे मिळतील. तसेच पत्रकारांना आज बँकांमध्ये गृहकर्ज मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, यावर कोणीच काही भूमिका घेत नाही. पत्रकारांना सहज गृहकर्ज उपलब्ध झाले पाहिजे. यामध्ये प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनाही लाभ घेता यावा, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.