पिंपरी I झुंज न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. विभागाचे ११७ कर्मचारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहे. हे कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षाहून अधिक काळ महापालिकेची सेवा करीत आहेत. त्या सर्व कर्मचा-यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, त्यांना इतर कर्मचा-यां प्रमाणे सर्व सुविधाचा लाभ देण्यात यावा, असे आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून सुरु असलेल्या ११७ कर्मचा-यांच्या लढाईला यश आले असून शासन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, याकरिता आयुक्त राजेश पाटील यांना पत्र देणार आहे, अशी माहिती नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे सुमारे २३५ कर्मचारी सन २००१ पासून कामकाज करीत होते. त्यातील ११८ कर्मचारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झाले होते. ११७ कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते व अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. मात्र, ते महापालिकेचे कामकाज करीत होते. त्यांची हजेरीची प्रतिपूर्ती दरमहिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवून देत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनाम सर्व कर्मचाऱी महापालिका सेवेत काम करीत आहेत.
‘पीएमपीएमएल’ मधील ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात यावे, अशी कित्येक वर्षापासून त्या कर्मचा-यांची मागणी होती. त्यानूसार गेल्या चार वर्षापासून सर्व कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. त्याकरिता महापालिका सर्वसाधारण सभा आणि ‘पीएमपीएमएल’ च्या संचालक मंडळाच्या सभेत ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.
तसेच सदरील ठराव राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवून त्या ठरावाला मान्यता देण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. दरम्यान, नगर विकास विभागाने ‘पीएमपीएमएल’ च्या ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत समायोजित करुन नियमित कर्मचा-यानूसार त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश उपसचिवांनी दिले आहेत. त्यानूसार ‘पीएमपीएमएल’ कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याच्या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच सर्व कर्मचा-यांना सामावून घेतल्याचे पत्र देण्यात यावी.अशी मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करणार आहे, असेही नगरसेविका माधूरी कुलकर्ली यांनी सांगितले.