मुंबई | झुंज न्यूज : बीसीसीआयने टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात (IND vs SL Time Table) बदल जाहीर केले आहेत. श्रीलंकन संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेने होईल, तर 4 मार्चपासून मोहालीमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली मोहालीत 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार दोन्ही संघांमधील मालिका आधी 26 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांनी सुरू होणार होती, परंतु आता वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या दौऱ्याची सुरुवात टी-२० सामन्यांनी होत आहे.
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीवरून टी-20 मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण श्रीलंका टी-20 संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे त्यामुळे संघाला एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये जावे लागणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघालाही एक बायो बबल पार करावे लागणार आहे.
कोहली होम ग्राऊंडला मुकणार
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. याअंतर्गत 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे होणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील, जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता मोहालीत 100 वा कसोटी खेळणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, त्याची 100 वी कसोटी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होती, कारण या मालिकेची सुरुवात 26 फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथे होणार्या कसोटीने होणार होती, परंतु वेळापत्रक बदलल्यामुळे यातही बदल झाला आहे.
गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये बेंगळुरू हे त्याचे होम ग्राउंड (RCB) आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने प्रवास कमी करण्यासाठी मोहालीमध्ये पहिली कसोटी ठेवली आहे, जिथे संघ जवळच्या धर्मशाळा शहरातून पोहोचेल.
या मालिकेत भारत आणि श्रीलंकेचे संघ डे-नाईट कसोटीही खेळणार आहेत. ही कसोटी 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. अहमदाबादमध्ये ही कसोटी खेळली गेली आणि दोन दिवसांत सामना संपला. टीम इंडियाने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळली आणि जिंकली, तर ऑस्ट्रेलियात पराभव झाला.
IND Vs SL मालिकेचे वेळापत्रक
24 फेब्रुवारी – पहिला T20 सामना, लखनौ
26 फेब्रुवारी – दुसरा T20 सामना, धर्मशाळा
27 फेब्रुवारी – तिसरा T20 सामना, धर्मशाळा
4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली
मार्च 12-16 – दुसरी कसोटी, बेंगळुरू (डे-नाईट)