शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण
पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी सत्ताधारी भाजपा पदाधिकारी कटिबद्ध आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील विविध रस्त्यांवरील विकासकामांचे लोकार्पण केले आहे.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार अमर साबळे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांसह नगरसेवक , पदाधिकारी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभाग क्र २६ मधील साई चौक, जगताप डेअरी वाकडहून नाशिक फाट्याकडे जाणारा ग्रेड सेपरेटर लोकांसाठी खुला करण्यात आला. यामुळे नागरिकांची वेळेची बचत, वाहतूक कोंडी यातून सुटका होणार म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सत्ताधारी भाजपाचा विकासकामांचा धडाका…
वैदू वस्ती, पिंपळे गुरव येथील श्रीमती शेवंताबाई खंडुजी जगताप- माध्यमिक शाळा क्र. २८ चे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथील लहान मुलांच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. सुदर्शन नगर प्रभाग क्रमांक २९ मधील बीआरटीएस विभागांतर्गत नाशिक फाटा व वाकड या बीआरटीएस रस्त्यावर समतल विलगकाचे लोकार्पण करण्यात आले. प्रभाग क्र. १७, बिजलीनगर, आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या भूयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.