पुणे I झुंज न्यूज : ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या, यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. 6 जागा ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी सुरु आहे.
कोणकोणत्या 6 जागांवर मतदान
अ वर्ग मुळशी आणि शिरुर तालुक्यातील दोन जागा
महिला सर्वसाधारण दोन जागा
क वर्ग आणि ड वर्ग प्रत्येकी 1 जागा
बारामती तालुक्यात 4 जागांसाठी होणार मतदान
सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत
कोणाकोणाची बिनविरोध निवड
प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
अजितदादांची एकहाती सत्ता
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.
बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2