चिंचवड I झुंज न्यूज : कै. मनीषा भोईर यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कै.मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पंधरा वर्षे व दहा वर्षे पूर्ण झालेल्या चिंचवडेनगर, बिजलीनगर आणि दळवीनगर मधील महिला बचतगटांचा सत्कार समारंभ नुकताच भोईरनगर येथे संपन्न झाला.
यावेळी स्थानिक उल्लेखनीय कार्य महिला बचतगट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या अध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या हस्ते परिसरातील नविन महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी वैशालीताई काळभोर यांनी महिला बचत गटांनी व्यवसायात कसे उतरावे व त्याचा प्रसार कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तसेच भविष्यात त्याची उपलब्धता कशी आहे हे सांगितले.
गीताताई मंचरकर यांनी आपल्या भाषणात कै. मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या, प्रभागातील महिलांच्या मदतीसाठी त्या नेहमी तत्पर असत, त्याप्रमाणे किरण भोईर या कार्यतत्पर असतात. त्यांच्याच पाऊलावर पाउल ठेऊन आज किरण भोईर खंबीरपणे या सर्व बचत गटांच्या मागे उभ्या आहेत. त्या वेळोवेळी महिलांसाठी व्याख्यान व इतर उप्रकम राबवीत असतात ज्यामधून महिलांना व्यवसायिक व आर्थिक समृद्धी मिळते. तसेच समाजात वावरतांना त्यांना योग्य दिशा मिळते.
किरण भोईर यांनी आपल्या भाषणात बचत गट आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला. एक महिला स्वयंस्फूर्तीने महिला बचत गटामार्फत कितपत काम करू शकते याबाबत तसेच महिला बचत गटाने सतत कृतीशील राहावे असे प्रतिपादन केले. यावेळी सौ मानसी भोईर घुले, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महासंघाच्या वतीने प्रभागातील १५ वर्षे पूर्ण केलेल्या क्रियाशील महिला बचत गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच काही नवीन महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम शिंदे यांनी केले. प्रास्ताविक पिं.चिं.महिला बचत महासंघाच्या अध्यक्ष किरण हर्षवर्धन भोईर यांनी केले तर आभार प्रतिभा कंकाळे यांनी आभार मानले. नगरसेविका गीता मंचरकर, वंदना सावंत, मंगल पानसरे, गीतल गोलांडे, प्रतिभा कंकाळे, लता चौगुले, सुप्रिया भिंगारे, मंगल ढगे, अंजली भोसले आदि उपस्थित होते.
प्रशासनाच्या कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.