समस्त पिंपळे गुरवकरांनी अनुभवला अनुपम कीर्तन सोहळा ; शामभाऊ जगताप युवा मंच, तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशन व आदियाल स्पोर्ट क्लब तर्फे आयोजन
सांगवी | झुंज न्यूज : कोरोनामुळे लाखोंच्या संख्येत लोकांचा जीव गेला. मात्र, आपण केवळ परमेश्वराच्या कृपेने जीवंत आहोत. याचाच अर्थ आता तरी आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे चांगल्या मार्गाने जीवन जगून आयुष्याचा आनंद लुटा, असे आवाहन ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी केले.
पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंच, तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशन व आदियाल स्पोर्ट क्लब यांच्या संयुक्तपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी ‘आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा’, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करत संत साहित्याची आवश्यकता बोलून दाखविली. संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कीर्तन सोहळ्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, पिंपळे गुरव भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. जयवंत देवकर, नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, तृप्तीताई जवळकर, उज्ज्वलाताई ढोरे, अंकुशअप्पा जवळकर, दिलीप अण्णा काशीद, मधुकर रणपिसे, शंकरतात्या जगताप, जनार्दन जगताप, बाळासाहेब काशीद, कीर्तन सोहळ्याचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे, दत्ता कदम, ह.भ.प. राजाभाऊ फुगे महाराज, तसेच भजनी मंडळे, सर्व ज्येष्ठ नागरिक संघ आदींसह समस्त पिंपळे गुरवकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चैतन्य महाराजांनी आपल्या निरुपणात सांगितले, की आयुष्य कसे जगावे, हे गाथा सांगते, तर आयुष्यातील समस्यांचे निवारण ज्ञानेश्वरी करते. गाथेच्या विचाराने आपण आयुष्य जगले पाहिजे. मानवी जीवन कोणत्या दिशेने जात आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. चांगल्या कर्माने आणि नीतीमत्तेने आयुष्य जगण्याची आवश्यकता आहे.
तरुणपणातील आत्महत्या, भरकटलेल्या तरुणाईला रुळावर आणण्यासाठी संत साहित्याची नितांत गरज आहे. संगत बदलली पाहिजे. संगत आपल्या जीवनात प्रभावी काम करते. गाथ्यातील विचाराला अंगिकारून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे. विचारांची देवाणघेवाण करणे फार मोठे काम आहे, असे सांगत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले, हा स्तुत्य उपक्रम आहे.
संतांच्या वचनाची खरी किंमत कोरोनाकाळात कळाली. परमार्थाशी ज्यांचा काहीही संबंध नाही, त्यांना परमार्थाची गरज भासू लागली आहे. कुणी कुणाचे नाही, याची जाणीव कोरोना काळात प्रकर्षाने जाणवली. पण हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे. तरुणाईने तुकाराम महराजांचे किमान पाच अभंग आणि त्यांचे अर्थ जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये. एवढा बदल तर प्रत्येकजण करू शकतो. संत साहित्याच्या आधारे जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
संतांच्या जीवनातील वैचारिक उंची व आपली वैचारिक उंची तपासून घेऊन जीवन जगले पाहिजे. माणसं बदलली म्हणजे बुद्धी बदलते. आजची पिढी सुसंस्कृत बनवायची असेल, तर ज्ञानोबा व तुकोबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, असेही ह.भ.प. चैतन्य महराज वाडेकर यांनी सांगितले.
सूत्रसंचालन दत्ता कदम यांनी, तर आभार तानाजी जवळकर यांनी मानले.