पुणे | झुंज न्यूज : राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे किंवा २३ ऑक्टोबरपूर्वी संपणार आहे, तसेच ज्या बाजार समित्यांवर प्रशासक आहेत, अशा सर्व बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. संभाव्य मतदार यादी आणि निवडणुकांसाठीची प्रारूप मतदार यादी १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी आदेश प्रसृत केले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांच्या निवडणुका २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती शासनाने ३० सप्टेंबर रोजी उठवली असल्याने प्राधिकरणाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकांसाठी ३० सप्टेंबर या अर्हता दिनांकावर प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत, तर ज्या समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत २३ ऑक्टोबरनंतर संपणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांकरिता अर्हता दिनांक निश्चित करण्याबाबत स्वतंत्र आदेश प्रसृत करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप, हरकती १० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मागवण्यात येणार आहे. प्राप्त हरकतींवर २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत निर्णय होईल. अंतिम मतदारयादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १६ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. १६ ते २२ डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवार अर्जांची छाननी २३ डिसेंबरला होणार असून अर्ज माघारीसाठी २४ डिसेंबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत असेल. निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी १० जानेवारीला प्रसिद्ध होईल. मतदान १७ जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.