शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांची मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी स्वतंत्र ‘महिला पोलिस ठाणे’ निर्माण करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
बुधवारी (दि. 29 सप्टेंबर) राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची शिष्टमंडळासमवेत पोलिस आयुक्तालयात भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके तसेच संगिता कोकणे, सविता धुमाळ, प्रेमा शेवाळे, आशा शिंदे, उज्वला वारिगे, माहेश्वरी परांडे, संगिता शहा, ज्योती निंबाळकर, विमल गायकवाड, आशा मराठे, मनिषा कोकीळ, सारीका ढमे आदी उपस्थित होत्या.
या मागणीचे पत्र काळभोर यांनी मुख्यमत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही ऑनलाईन पाठविले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 ला करण्यात आली. मागील सहा महिण्यात शहरात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये मागील आठवड्यात सलग काही दिवस विविध ठिकाणी, विविध कारणास्तव खूनाच्या घटना घडल्या. महिलांवरील अन्याय, अत्याचारात देखिल वाढ झाली असल्याचे विविध माध्यमांनी प्रसिध्द केले.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध कारखान्यांमध्ये तसेच हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये आणि नव्याने विकसित होत असलेल्या चाकण, तळेगाव, महाळुंगे एमआयडीसीमध्ये युवती, महिला मोठ्या प्रमाणात नोकरी करीत आहेत. त्यामुळे अनेक महिलांना पहाटे लवकर व रात्री उशिरा कामावर ये – जा करावी लागते. वाढत्या गुन्हेगारीमुळे या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. तसेच एखाद्या महिलेवर काहि प्रसंग उद्भवला तर वेळ प्रसंगी पोलिसांच्या भितीमुळे अथवा कुटूंबातून पाठबळ मिळत नसल्यामुळे या महिला पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास जात नाहीत.
“शहरात जर चेन्नई शहराप्रमाणे एखादे पोलिस ठाणे फक्त महिला पोलिस कर्मचारी आणि महिला अधिका-यांचे असेल तर त्या ठिकाणी अशा अन्यायग्रस्त, पिडीत युवती, महिला निसंकोचपणे फिर्याद देण्यासाठी जाऊ शकतील असे गुन्हे नोंद झाले तर या गुन्हेगारांना अटक करुन अशा घटना रोखण्यासाठी उपयोग होईल. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणी फक्त महिला पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिस अधिका-यांचीच नियुक्ती असणारे ‘महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे’ उभारावे अशी मागणी या पत्रात केली आहे.
आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या बाबत माहिती घेऊन तसा मागणीचा प्रस्ताव तयार करुन लवकरच वरिष्ठांकडे सादर करु असे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.