मुळशी I झुंज न्यूज : तालुक्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्वाचा आधार मिळाल्याने जिद्दीच्या जोरावर आपले शिक्षण घेणाऱ्यांचा पुढील मार्ग सुकर झाला आहे. हिंजवडी येथील व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पिंजण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पिंजण यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून दुर्गम भागातील दहा विद्यार्थ्यांचे वर्षभरासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
कातरखडक जिल्हा परिषद शाळेतील पालकत्व स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचा धनादेश नुकताच, शाळेचे शिक्षक अरुण घोळवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी हिंजवडी नगरीचे माजी उपसरपंच तानाजी हुलावळे उपस्थित होते.
“पिंजण यांनी यापूर्वी देखील अनेकदा निराधार गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा शालेय विद्यार्थ्यांना भरघोस मदत केली आहे. नुकत्याच घडलेल्या पिरंगुट एमआयडीसीतील दुर्दैवी जळीतकांड प्रकाणातील बाधीत कुटुंबाला देखील त्यांनी तात्काळ आर्थिक मदतीचा हात दिला होता.
सध्या कोरोना महामारीमुळे सगळेच आर्थिक दृष्ट्या हतबल झाले आहेत, तरीही शक्य असेल तिथे अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत केली पाहिजे असे बाळासाहेब पिंजण यांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असून, प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी समजून विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे असे हिंजवडीचे माजी उपसरपंच तानाजी हुलावळे यांनी सांगितले.