गोंदिया I झुंज न्यूज : अश्लिल व्हिडीओ प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जर भाजपमध्ये गेला, तर भाजपवाले त्याचे व्हिडीओ रामायणाचे म्हणणार का ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते गोंदियात बोलत होते. भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते, मात्र कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असं म्हणत नाना पटोले यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील लूकआऊट नोटीसवर भाष्य केलं.
नाना पटोले म्हणाले, “ईडीने सर्व विमानतळ प्राधिकरणाला अनिल देशमुख यांच्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. या कायदेशीर बाबी आहेत, मात्र जे लोक भाजपाविरोधात आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जाते. मात्र भाजपात काय दुधाने धुतलेली लोकं आहेत का ? भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही का? जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले, तर ते व्हिडीओ रामायणाचे आहेत असे भाजपा म्हणणार आहे काय? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. जर भाजपचा विरोध केला म्हणून जर या स्वायत्त संस्थेचा जर कोणी वापर करत असेल तर हे चुकीचे आहे”
‘देशाचे पंतप्रधान हेच संघाचे प्रचारक’
एखादी संघटना देशापेक्षा मोठी नाही, असा अप्रत्यक्ष टोला नाना पटोले यांनी राष्ट्रीय समाजसेवा संघाला लगावला. गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली.
या भूमिकेबद्दल नाना पटोले म्हणाले की “देशाचे प्रधानमंत्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळेच तर RSS देश विकायला जात असतानासुद्धा काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांवर लाठीमार होत असेल अशा प्रश्नांवर काही बोलत नाहीत. म्हणजेच या गोष्टींचे समर्थन जर आरएसएस करत असेल आणि त्या प्रसंगावर जर जावेद अख्तर काही बोलत असतील, तर त्यात काही वेगळं नाही. कारण देशापेक्षा एखादी संघटना मोठी नाही. जर एखादी संघटना असं समजत असेल तर हे देशाला हानिकारक आहे, असं नाना पटोले म्हणाले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही – नाना पटोले
महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव घातला आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जो संवैधानिक अधिकार ज्या समाजाचा आहे, तो त्याला मिळायला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारनेसुद्धा तोच प्रयत्न केला आहे. ओबीसी आरक्षण कमी करण्यात भाजपचा सिंहाचा वाटा आहे. आजही ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसची भूमिका जाहीर आहे की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही, असं पटोलेंनी सांगितलं.
वरुण गांधी हे कँग्रेसच रक्त
भाजपचे खासदार वरुण गांधी जर शेतकरी आंदोलनाला भेट देत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. कारण शेवटी ते गांधी घराण्याचे आणि काँग्रेसचेच रक्त आहे. शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर ते कसं सहन करणार? त्यामुळे ते शेतकरी आंदोलनात गेले असतील तर स्वागतच आहे, असं नाना पटोले म्हणाले.