पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काहीवेळा ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने वायसीएम रुग्णालयात नागरिकांचा मृत्यू झाला म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. आता शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांनीही कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यू संख्येवर संशय व्यक्त करत बैठक घेऊन प्रशासनाला खुलासा मागणार आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी आयुक्तांना अनेक प्रकरणांचा खुलासा मागवून प्रशासनासोबत सत्ताधारीचे सूर जुळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाच्या गोंधळात शहरातील सामान्य जनता भरडली जातेय याला जबाबदार कोण असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधारी पक्ष कोरोनाची आधुनिक वार रूम बनवली असल्याचा दावा करते. तसेच पालकमंत्र्यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीवरून शहरात खाजगी रुग्णालय मध्ये उपलब्ध बेडची संख्या पालिकेच्या पोर्टलवर दिसण्यासाठी मागणी केली मात्र त्याचे श्रेय सत्ताधारी भाजपचे आमदार लाटताना दिसले. सत्ताधारीकडून प्रत्येक प्रभागांमध्ये एक क्व्यारंटाइन सेंटर करणार असल्याची घोषणा केली. परंतु ही योजना शहरातील एकाच विधानसभा मतदारसंघात राबवली जात आहे.
पिंपरी, चिंचवड व भोसरी हे शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपच्या कारभाऱ्यांनी एकाच मतदारसंघात लक्ष ठेवल्यास शहरातील कोरोना प्रभाव कमी होणार नाही हेे प्रशासनान लक्षात आले पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने रविवारी दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजता ८ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रसिद्धीमाध्यमांना साठी पहिली प्रेसनोटमध्ये सांगत एकुण आकडेवारी ४५७ दिली. तर पालिकेच्या डिस्प्लेवर मृत्यू संख्येत तफावत दिसल्याने रात्री ९:३५ ला दुसरी प्रेसनोट काढून ती २० ने वाढवत आकडेवारी ४७७ दिली. त्यामुळे दिवसभरात किती जणांचा मृत्यू झाला यावर वैद्यकीय विभागातील विक्रम काटकर यांच्या सांगण्यानुसार व वैद्यकीयकडून आलेल्या अहवालानुसार २८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावरुन प्रशासन किती जागरूक आहे हे दिसून येते. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे सर्व सावळागोंधळ सुरू आहे.
महापालिकेत सत्तेवर आल्यापासून भाजपने अनेक कामासाठी तज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून कोट्यावधी रुपयाची आर्थिक लूट केली आहे. त्यांच्याकडून कोरोना महामारी कालावधीत कोणताही सल्लागार न नेमल्यामुळे प्रशासनात गोंधळ सुरू आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलकडून कोरोनाच्या नावाखाली लूट सुरू आहे. त्यांच्या उपचार व बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शहरातील कोरोना परिस्थितीती हाताळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तज्ञ सल्लागार नेमावा नाहीतर सल्लागारांच्या जीवावर प्रशासन चालवणे भाजपने बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते. अशावेळी नागरिकांना व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन व्हेंटिलेटर, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज, औषधे, इंजेक्शन आधी उच्च दर्जाच्या खरेदीबाबत व पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार नाही. मात्र कोरोनाच्या आडुन भ्रष्टाचार व राजकारणही खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस कडून वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.