बाल काव्य संग्रहाचे नाव – वाघोबाचा मोबाईल
कवी – सचिन बेंडभर
प्रकाशक- दिलीपराज प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती – १५जून २०२१
पृष्ठे – ३२
स्वागतमूल्य – १००
—————————————————————-
बालमन जपणारा काव्यसंग्रह
येते जगाया उभारी या काव्य संग्रहाच्या उत्तुंग यशानंतर पाठ्य पुस्तकातील कवी, लेखक सचिनजी बेंडभर छोट्या दोस्तांसाठी वाघोबाचा मोबाईल हा बाल काव्य संग्रह घेऊ आले आहेत.
लहानांच्या भाव विश्वाशी निगडीत शब्दांची निवड, आकर्षक चित्रे ,रंगीत सजावट,गुळगुळीत पाने यामुळे काव्यसंग्रहाचा दर्जा उंचावला आहे. ज्यांनी मनात बालमन जपलं आहे तेच कवी काव्याची निर्मिती करू शकतात. सचिनजी बेंडभर हे काव्यरत्न त्यापैकीच एक होत.गुणगुणायला सोप्या असलेल्या या कविता मनात नक्कीच रुंजी घालतील . मनोरंजनातून संस्कार या काव्यसंग्रहाचे वैशिष्ठ्य सांगता येईल.
बालकाव्य लिहिणे तसे कठीण काम. मुलांचा आनंद,उत्साह टिकवून ठेवणे यात खरा कस लागतो. शिक्षक असल्याने मुलांना आनंद देणे खळखळून हसायला लावणे ,गोष्टी सांगणे हे करताना कवी स्वतःच एक मूल होऊन जातात. मुलांच्या भावना जपण्याचे,आनंद द्विगुणीत करण्याचे काम काव्यसंग्रह निश्चित करेल अशी आशा आहे.
प्राणी ,पक्षी यांनाही मोबाईलचे वेड लागले आहे, त्यामुळे मोबाईल सर्वांचाच प्रिय झाला आहे. वाघोबाचा मोबाईल या कवितेत बछड्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरल्यावर हेच सांगितले आहे.
वाघ म्हणाला बछड्याला वाढदिवस साजरा करू
सगळे प्राणी बोलावू घरी मोबाईलवर कॉल करू.
मुलांना विविध गोष्टीचे वाटणारे कुतूहल, त्यांना पडणारे प्रश्न यांना मोकळी वाट करून देण्यासाठी घरातील हक्काचं स्थान म्हणजे आजी आजोबा. संस्कारी बीजांचं रोपण करण्याबरोबरच मुलांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम काम करतात. आजी आजोबांसोबत असलेला लळा, उबदार मायेचा हात असल्यावर मुलांना आकाश ठेंगणे होते.
मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे पावसात भिजणं,कागदाच्या होड्या पाण्यात सोडणं ही वेगळीच मजा असते. पावसात भिजण्याची मजाही पावसाची सर कविता देते. आजोळ कवितेत आधुनिक गोष्टी मामाच्या घरात आल्यामुळे मामाचा वाडा, घुंगराची गाड़ी काळाच्या ओघात हरवल्याचंही खंत कवी बोलून दाखवतात.. तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकवलेली शेती, सिमेंटच्या आभाळाला टेकणाऱ्या इमारती आल्याने आजोळाचं आजोळपण निघून गेलं.ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे.
आता नाही मोटनाडा
पाणी खेळेना पाटाशी
पंप विजेवर चाले
थेंब ठिबके मुळाशी
आता नाही चिरेबंदी
वाडा मामाचा राहिला
मजल्यावरी मजले
बंगला नभासी टेकला.
माझी बाहुली ,साखरशाळा, सेतूशाळा म्हणत भरणारी पाखर शाळा या कविताही भावल्या. लहान मुलांना निसर्गप्रेम, प्राण्यांविषयी ओढ , प्रबोधन, संस्कारांची जडणघडण अशी वाटचाल करत लहान मुलांचे भावविश्व घडवण्याचे काम सचिन बेंडभर यांची कविता करते .
संतोष घोंगडे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ आणि आतील रंगीत पानांनी कविता अधिक उठावदार झाल्या आहेत. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची कौतुकाची थाप काव्यसंग्रहाला मिळाली आहे…
बालकाव्याला भरघोस यश मिळो या सदिच्छा..
पुढील काव्यलेखन वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…..
सरिता कलढोणे,जुन्नर
मोबाईल : ९६८९९१४८३४
—————————————————————-