पिंपरी-चिंचवड ‘भाजपा’तर्फे कार्यकर्ता महासंपर्क अभियान ! ; डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त उपक्रम

पिंपरी I झुंज न्यूज : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारपासून (दि. ६) शहर भाजपातर्फे कार्यकर्ता महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक हजार कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अडचणी जाणून, मार्गदर्शन करत संघटन मजबुतीसाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होणार आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे.

“डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनापासून (६ जुलै) ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत (१७ सप्टेंबर २०२१) या कालावधीत हे कार्यकर्ता महासंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व फळीचे कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, त्याच्या अडीअडचणी व काम करताना येणाऱ्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन करणे, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन कामाला अधिक गती देणे, शहरात पक्षवाढीच्या दृष्टीने विविध कार्यक्रम, अभियान राबवण्याबाबत सूचना देणे यासह पक्ष आणि संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने हे अभियान प्रामुख्याने राबवण्यात येणार आहे.

यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यक्रत्ये यांचे वेगवेगळे गट करून शहरातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच आमदार लांडगे आणि जगताप हे स्वतः उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर होऊन नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

शहर भाजपातर्फे बूथ मजुबतीकरणाचा प्रयत्न…

कोरोना काळामध्ये पक्ष कार्यक्रम, भेटीगाठी यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र या काळातही शहर भाजपकडून नागरिक व कार्यकर्त्यांना मदतीचा हात देण्यात आला होता. कोरोनातून सावरत असताना शहर भाजपा पुन्हा कामाला लागली आहे.

नागरिकांपर्यंत कार्यकर्ते आणि पक्षाचे काम पोहचायला हवे आशा सूचना आजी माजी शहाराध्यक्षांनी दिल्या आहेत. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बूथ मजबुतीकरणाला सुरवात केली आहे. त्याद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी संपर्क साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *