शिरूर I झुंज न्यूज : शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी गेल्या महिन्यात आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता १० जुलै रोजी सभापती पदाची निवडणूक होणार आहे. मात्र सभापती पदी संधी कोणाला मिळणार हे आणखी गुलदस्त्यातच आहे.
गेल्या वर्षी शशिकांत दसगुडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिरुरच्या ३९ गावच्या संचालकाला संधी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी माजी सभापती प्रकाश पवार यांनी मी इच्छुक नसल्याचे आधीच नमूद केले होते. उर्वरित मानसिंग पाचूंदकर आणि शंकर जांभळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. दोघांनीही पक्ष श्रेष्ठींकडे साकडे घातले. आमदार अशोक पवार यांच्या मर्जीतले शंकर जांभळकर यांना संधी देण्यात आली.
जांभळकर यांनी एका वर्षात शिरुर बाजार समितीचा चेहरा बदलून टाकला. इनाम, मापाडी अँप, कर्मचारी विमा कवच, मुख्य प्रवेशद्वार सुशोभीकरण, जनावरांचा बाजार, जाहीर लिलाव, पाबळ उपकेंद्र सुरु केले यांसारख्या अनेक गोष्टी बाजार समितीच्या इतिहासात नव्याने घडवून आणल्या. त्याचबरोबर अडीच कोटी रुपये नफ्यात बाजार समिती आणून ठेवली. अशा प्रकारची विधायक कामे केल्यानंतरही जांभळकर यांना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार राजीनामा द्यावा लागला.
गेल्या वर्षभरात शंकर जांभळकर यांनी सभापती पदाची जबाबदारी स्वीकारुन बाजार समितीत केलेली कामे आणि प्रस्तावित कामांचा शिवधनुष्य यापुढे कोण पेलवणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे. येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक संचालकांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे.
इच्छुकांमध्ये ऍड. वसंत कोरेकर, आबाराजे मांढरे, विश्वास ढमढेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ऍड. वसंत कोरेकर हे सर्वात जेष्ठ संचालक आणि दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहेत. त्याचबरोबर पूर्व भागाला ऍड. कोरेकर यांच्या रुपाने माजी आमदार रावसाहेब पवार यांच्यानंतर सभापती पदाची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आह.
दरम्यान आबाराजे मांढरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. मांढरे यांचा राजकारणातील आलेख गेल्या काही वर्षांपासून चढता आहे, सुरुवातीला शिक्रापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच नंतर पत्नी जिल्हा परिषद सदस्या, स्वतः बाजार समितीत संचालक असा आबाराजे मांढरे यांचा आलेख चढताच आहे. त्यात आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यामुळे आबाराजे मांढरे यांना सभापती पदाची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.
दरम्यान माजी उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी देखील सभापती पदी संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तळेगावच्या ढमढेरे परीवाराचा यापूर्वी देखील तालुक्याच्या राजकारणात नेहमीच दबदबा आहे.
ज्याप्रमाणे पंचायत समितीच्या माजी उपसभापती मोनिका हरगुडे यांना पंचायत समितीच्या सभापती पदी संधी मिळाली त्याप्रमाणे विश्वास ढमढेरे यांना देखील बढती मिळाली तर नवल वाटायला नको. त्यामुळे येत्या काळात सभापती पदाची एक्सप्रेस कोणाच्या रुळावरून धावणार त्याचबरोबर जांभळकर यांनी शिरुर बाजार समितीत सुरु केलेला विकासाचा शिवधनुष्य सभापती पदी विराजमान होऊन कोण पेलणार…? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.