चिंचवड | झुंज न्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील जैन बांधवांनी भगवान श्री महावीर जयंती विविध सामाजिक कार्यातून साजरी केली. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व गोरक्षा साठी चारा संकलन करीत सामाजिक बंधीलकी जपत यंदाची जयंती साजरी केली.
सत्य, अहिंसा व अपरिग्रह हा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त शहरातील जैन बाधंवांनी रक्तदाना शिबिराचे आयोजन केले होते. जितो चिंचवड-पिंपरी, भारतीय जैन संघटना, जैन सोशल ग्रुप डायमंड व विर विशाल ग्रुप यांनी चिंचवड गावातील कल्याण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात महिलांचा सहभाग वाखण्या जोगा होता.
या प्रसंगी आमदार आणा बनसोडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांनी उपस्थित बंधवांना शुभेच्छा दिल्या.
कासारवाडी, वाकड, भोसरी जैन स्थानकातील पदाधिकर्यांनी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक संदेश दिला, जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले. गोरक्षा संकल्पनेतुन चारा संकलन करीत संस्थेच्या वतीने चारा वाटपाचे कार्य केले.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चिंचवड स्टेशन येथे संघाचे अध्यक्ष जयप्रकाश राका यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. शासनाच्या नियमांचे पालन करून प्रार्थना व जाप मर्यादित पाच श्रावकांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्व जण कोरोना मुक्त व आरोग्य संपन्न व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात आली.
शहरातील जैन मंदिर ट्रस्ट व जैन श्रावक संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यातून जयंती साजरी करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली.