भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी माझ्यावर दबाव आणला ! ; ठाकरे सरकारमधील “त्या” मंत्र्याची कबुली

मुंबई I झुंज न्यूज : सध्या राज्यात गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर दबाव आणल्याची कबुली दिली आहे.

मी ही गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्या काळामध्ये मी भाजपसोबत यावे, यासाठी शुक्ला मला भेटल्या होत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही, असे मी शुक्ला यांना सांगितले. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

रश्मी शुक्लांच्या बचावासाठी भाजप मैदानात

फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या रडारवर असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बचावासाठी आता भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला. सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते.

रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?

रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला होता. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केली असून, गुप्त अहवाल उघड करणे हे अत्यंत गंभीर आहे. हा अहवाल त्यांनीच फोडल्याचे उघड झाल्यास त्या कठोर कारवाईस पात्र ठरतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे शुक्ला यांच्या विरोधात कारवाईची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *