पिंपरी I झुंज न्यूज : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी आरोपीने हुज्जत घातली. धक्काबुक्की करून आरोपीने पोलिसाचा शर्ट फाडला. थेरगाव येथे सोमवारी (दि. २२) हा प्रकार घडला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपीला २ जुलै २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. शासनाची कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय तो पिंपरी-चिंचवड शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी बबल्या उर्फ सागर बापू खताळ (वय २२, रा. थेरगाव) हा १६ नंबर, थेरगाव येथे थांबला असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक पी. डी. कदम यांच्यासोबत त्याने हुज्जत घातली. कदम यांना धक्काबुक्की करून त्यांचा शर्ट फाडला.
फिर्यादी पोलीस नाईक कदम करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. याबाबत पोलीस नाईक पी. डी. कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बबल्या उर्फ सागर बापू खताळ याला अटक करण्यात आली असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.