धक्कादायक ! क्रिकेट खेळता खेळता तो मैदानावर कोसळला आणि… ; क्रिकेट विश्वातील दुःखद घटना

पुणे I झुंज न्यूज : क्रिकेटचा सामना रंगात आलेला, उपस्थित प्रेक्षकांचा कल्ला, बॉलरने बॉल टाकला, बॅट्समन बिट झाला, खालच्या प्लेयरने अंपायरशी काही चर्चा केली, तो खाली बसला आणि कोसळला! बोरी बुद्रूक नजिकच्या जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक स्पर्धेच्या क्रिकेट सामन्यात ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झालीय.

दोन दिवसांपासून या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेदरम्यान १७ फेब्रुवारीला क्रिकेटचा सामना सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं एका खेळाडूचा करुण अंत झालाय.

१७ फेब्रुवारीला ओझर संघ आणि जांबुत संघा दरम्यान हा सामना सुरु होता. यावेळी ओझर संघाचा नामवंत खेळाडू आणि कॅटवे ओतुर संघाचा धोलवड गावचा खेळाडू बाबु नलावडे याचं दु:खद निधन झालं आहे. बाबु नलावडे हा खेळाडू ४७ वर्षाचा होता. मैदानात फलंदाजी करत असताना अचानकपणे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो खाली बसला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो मैदानावरच कोसळला.

अचानक झालेल्या या घटनेमुळं मैदानावरील उपस्थित खेळाडूंना धक्का बसला. अशा स्थितीत बाबू नलावडे यांच्यासोबतच्या खेळाडूंनी त्यांना नारायणगाव इथल्या डॉ. राऊत यांच्या रुग्णालयात हलवलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबू नलावडेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसलाय. एखाद्या नामांकित खेळाडूचा अशाप्रकारे मैदानात मृत्यू झाल्याने क्रिकेटप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *