गोरेगाव फिल्मसिटीमधील ‘आदिपुरुष’ च्या सेटला भीषण आग ; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई | झुंज न्यूज : गोरेगाव फिल्मसिटीमधील स्टुडिओला भीषण आग लागली असून त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ‘आदिपुरुष’च्या सेटला सुद्धा आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

मुंबईमधील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये असलेल्या एका स्टुडिओला मंगळवारी (२ फेब्रुवारी) भीषण आग लागली. ज्या भागात आग लागली त्या भागात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. या सेटलादेखील आग लागली असून सेटचे खूप नुकसान झाले आहे.

प्राथमिक पाहता आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या बोलवण्यात आल्या. लक्ष्मी पार्क मध्ये लागलेली आग भीषण स्वरूपाची होती. ज्या वेळेस आग लागली तेव्हा स्टुडिओमध्ये तब्बल १०० लोक उपस्थित होते. अग्निशमन दलाकडून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीमुळे स्टुडिओ व ‘आदिपुरुष’ च्या सेटचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. प्रथम बंगूर नगर येथे संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी आगीचा भडका उडाला. ती आग पसरत गेल्याने आदिपुरुषच्या सेटला त्याची झळ बसली. अधिकाऱ्यांनुसार ही लेवल-२ ची आग होती.

स्थानिकांनी सांगितल्यानुसार त्यांनी या स्टुडिओ विरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. हा स्टुडिओ परवान्याशिवाय बांधण्यात आला होता. स्थानिकांनी महानगर पालिकेकडे या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. आग लागल्यानंतर आगीचे लोट आकाशाकडे झेपावताना स्थानिकांनी पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *