रडणाऱ्या बेवारस बाळाला बघून जीव झाला कासावीस, अन त्या महिला पोलिसाने दिली मायेची उब ! ; धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ चा प्रत्यय

हिंगोली I झुंज न्यूज : बेवारस बालकाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर तो रडण्याचे थांबत नाही पाहून जीव कासावीस झाल्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपले दूध देऊन त्या बाळाचे रडणे थांबविले. यामुळे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत असून पुन्हा एकदा धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ चा प्रत्यय दिसून आला.

१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची उब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. या बाळाची सलमा शेख या पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखही करीत आहेत. पोलिसांना परिस्थितीनुसार कठोर बनावे लागते. त्यासोबत कधी मायेची उबही द्यावी लागते, हे शेख या महिला पोलीस कर्मचाऱ्याने बाळाला आपले दूध पाजून दाखवून दिले. यामुळे कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे, हे सिद्ध केले आहे.

या बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन हिंगोली पोलिसांनी केले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोनि. उदय खंडेराय, पोउपनि एस. एस. घेवारे, नितीन केणेकर, पोलीस अंमलदार जाधव यांचे पथक काम करत आहे. तीन महिन्यांच्या बाळाच्या माता-पित्यांची माहिती असल्यास हिंगोली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्याचे नाव गुपित ठेवले जाईल,असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

तीन महिन्यांच्या बाळाला जिल्हा सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस ते बाळ रडण्याचे थांबत नव्हते. त्या बाळाला भूक लागली असावी हे केवळ माताच जाणते. मला रहावले नाही. मी क्षणाचाही विचार न करता त्या तीन महिन्यांच्या बाळाला माझे दूध पाजले आणि त्या तान्हुल्याचे रडणे थांबले. त्यानंतर माझे मन शांत झाले. सद्यस्थितीत बाळाची प्रकृती चांगली आहे.

– सलमा शेख, महिला पोलीस,
(हिंगोली शहर पोलीस ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *