- आम आदमी पक्षाचा विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा
चिंचवड I झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प आम आदमी पार्टीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला.
यावेळी आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्षा मिना जावळे, युवक शहराध्यक्ष रविराज काळे, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, संतोष इंगळे, स्वप्निल जेवळे, सोनाली झोळ, सुरेश बावणकर, मंगेश आंबेकर यांच्यासह शहरातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहाराध्यक्षा मीना जावळे म्हणाल्या, चिंचवडमध्ये विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. घराणेशाही व धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे उभे आहेत. त्यांना विजयी करण्यात आप मुख्य भूमिका बजावेल.
आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे म्हणाले, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडी सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो देशाच्या हिताचा आहे आणि त्यासाठी सर्व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी केल्यावरच महाराष्ट्रावर आलेले
भाजपरुपी आलेले संकट दूर होईल यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगतातून राहुल कलाटेंच्या विजयासाठी दिवस रात्र एक करण्याचे आश्वासन दिले.
“चिंचवडकरांना विविध समस्यातून कायमचे मुक्त करण्यासाठी माझी ही लढाई आहे. मला संधी दिल्यास चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सदैव कार्यरत राहील. माझ्यासाठी झटणाऱ्या आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार. निवडून आल्यानंतर आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देत त्यांना सोबत घेऊनच चिंचवडचा विकास साधला जाईल.
– राहुल कलाटे, उमेदवार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष“येथील उद्योग गुजरातला हलविल्याने महाराष्ट्रातल्या तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लाडकी बहीण सुरक्षित नाही, चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार?, दोनवेळा पाणीपुरवठा कधी होणार?, असे असंख्य प्रश्न अनुत्तरीत असतानाही भाजपने घराणेशाहीला खतपाणी घालत कर्तृत्व नसणाऱ्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अभ्यासू आणि जनतेची तळमळ असलेल्या राहुलदादांना विजयी करण्यासाठी आपचा प्रत्येक कार्यकर्ता झटत आहे.
– मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ते आप