अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा आरपीआयचा निर्धार
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अत्यंत सक्रिय व काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी व नेत्यांनी केला आहे. त्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्या.
आकुर्डी येथे आयोजित मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आरपीआयचे महाराष्ट्र संघटन सचिव परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी नगरसेवक सुजाता पालांडे, इलाबाई ठोसर, अंकुश कानडी, रामचंद्र माने, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र नेते सुरेश निकाळजे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती जकाते, शहर कार्याध्यक्ष योगेश भोसले, राजू उबाळे, सह कार्याध्यक्ष शरद फडतरे, बापू गायकवाड, राजेश बोबडे, सुजित कांबळे, शहर सरचिटणीस दयानंद वाघमारे, संभाजी वाघमारे, दिनकर मस्के, धम्मरत्न गायकवाड, सुवर्णा राक्षे, मंगल वाघमारे, रत्नमाला सावंत, दादा शिरोळे, नितीन पटेकर, संजय सरोदे, विनोद चांदमारे, श्रीमंत शिवशरण, गौतम आप्पा गायकवाड, अमोल वारभूवन, कृष्णा जाधव, बापू सरोदे, अक्षय गुणधन, सिकंदर सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, कमल कांबळे, विकास गाडे, दुर्गाप्पा देवकर, दयानंद वाघमारे, रत्नमाला सावंत, नवनाथ डांगे, आदी उपस्थित होते.
आपल्या खास कवितेच्या शैलीत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना सांगितले की, “महायुतीच्या पाठीमागे उभा आहे आरपीआयचा गडी, मग का येणार नाही अण्णा बनसोडे यांची घडी,”. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने मांडणी करून मत मागत आहेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्ही संविधानाला डाग लागू देणार नाही. देशाला अखंड ठेवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. ती आम्ही वाया जाऊ देणार नाही.
चंद्रकांता सोनकांबळे या मतदार संघात इच्छुक होत्या. त्यांच्यासह काहींनी अर्ज दाखल केले होते. पण माझा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. मी सांगितल्यानंतर सोनकांबळे यांनी अर्ज माघारी घेतला. त्या अनेक वर्षांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक वस्तीशी माझा संबंध आहे. अनेक प्रश्नांसाठी आपण सरकारसोबत काम करत आहोत. भारतात काँग्रेस आणि आरपीआय हे दोनच पक्ष असावेत अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. आता आरपीआय पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. मणिपूर, नागालँड येथे आपली ताकद वाढत आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप येथेही आपला पक्ष असून विदेशात देखील अनेकजण काम करण्यास इच्छुक असल्याचेही आठवले म्हणाले.
माजीअमर साबळे म्हणाले, देशपातळीवरील निर्णयात रामदास आठवले यांचे मत महत्वाचे असते. आरपीआयचा महापालिका निवडणुकीत योग्य सन्मान केला जाईल. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. या निवडणुकीत आरपीआयचे योगदान खूप महत्वाचे आहे.
चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, आठवले यांची सभा व्हावी अशी आमदार अण्णा बनसोडे यांची ईच्छा होती. मात्र वेळेअभावी ते शक्य नसल्याने ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले. पुढील काळात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या जागी काम करण्याची संधी मिळेल असे आश्वासन मिळाले आहे. आपल्या पक्षाचे प्रतिनिधी विधानसभेत असायला हवेत. आगामी निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळायला हव्यात. महापालिका निवडणुकीत आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, रामदास आठवले माझ्या प्रचारासाठी आले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. चंद्रकांता सोनकांबळे यांनी माझ्यासाठी मोठा त्याग केला आहे. आरपीआयने मला कायम साथ दिली आहे. जेवढं प्रेम उपमुख्यमंत्री अजित दादांनी केलं, तेवढंच प्रेम रामदास आठवले यांनी दिले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आगामी निवडणुकीत आरपीआयला योग्य सन्मान दिला जाईल अशी मी ग्वाही देतो. महापालिकेत आरपीआयचे खाते उघडणार हे नक्की, असा विश्वासही पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.