पिंपरी चिंचवड महापालिकेचे मतदार जनजागृती अभियान
पिंपरी I झुंज न्यूज : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात नवमतदार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आज चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पवार, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, महापालिकेचे मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किशन केंगले, लिपिक अभिजित डोळस, विकास गायकांबळे ,सचिन महाजन, पियुष घसिंग यांच्यासह महाविद्यालयातील शेकडो नवमतदार विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मताच्या अधिकाराचे महत्व पटवून सांगण्यात आले. तसेच लोकशाहीतील मताचा अधिकार नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा महत्वपूर्ण आहे. तसेच मताच अधिकार बजावणे हे आपले हक्क तर आहेच शिवाय महत्वपूर्ण कर्तव्य देखील असल्याचे, विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर ‘नो यूवर पोलिंग बूथ’ सुविधेद्वारे नागरिकांना आपल्या मतदान केंद्राबाबत माहिती दिली जाणार असून याद्वारे शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड या मतदार संघातील मताचे सरासरी प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.