विद्यार्थ्यांनी वनस्पतींचे महत्त्व व उपयोग समजून घ्यावे – मीना म्हसे

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे I झुंज न्यूज : आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. परंतु सर्वांचेच उपयोग व महत्त्व आपल्याला माहीत नसतात. अगदी छोट्या छोट्या आजारांपासून ते मोठमोठ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून या वनस्पतींकडे पाहीले पाहिजे. आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे आयोजित व्याख्यानमालेत औषधी वनस्पतींचे उपयोग व महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले.

खेड तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा दोंदे येथे गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष होते. उपक्रमशील शिक्षक भिमराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफण्यासाठी जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना म्हसे यांना औषधी वनस्पतींचे उपयोग व महत्त्व या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

सुरुवातीला टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सिद्धार्थ कोहिणकर अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मीना म्हसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गोष्टी व गाण्यातून मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करत झाडांचे महत्त्व विशद केले. स्वीडनमध्ये ग्रेटा थनबर्ग हिने विद्यार्थी दशेत असतानाच ग्लोबल वार्मिंगचे होणारे भीषण परिणाम जगाला पटवून दिले व मोठी क्रांती केली. तुम्हीही अशा प्रकारचे काम करू शकता, असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. यावेळी त्यांनी मुलांना जांभूळ, कोरफड, हळद, गवती चहा आणि अडूळसा या वनस्पती प्रत्यक्ष दाखवून मुलांना त्यांचे गुणधर्म, धार्मिक महत्त्व, औषधासाठी उपयुक्त भाग आणि आरोग्यासाठी त्याचे फायदे या गोष्टींची माहिती दिली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धार्थ कोहिणकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंद्रकांत बारणे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल सुकाळे,ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा दरवडे, सदस्या योगिता भालशिंगे, दोंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक खंडू करंडे, सहसचिव भरत उढाणे, रुद्र चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मंगल सुकाळे आणि विमा गुंतवणूकचे सल्लागार वैभव कोहिनकर उपस्थित होते.

मुख्याध्यापक तानाजी आंबेकर, वैशाली भगत, श्रीनाथ चोरघे, गणपत घुले,भिमराव पाटील, विजया जाधव,सुनिता पवार, वनिता गावडे आणि दिनेश धाकडे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावर्षी संदीप वाघोले जुन्नर, उत्तम सदाकाळ मढ, जीवन जरे पुणे, मनीषा मालुसरे मुळशी यांनी याआधी विद्यार्थ्यांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *