पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे झाले होते अनावरण
मालवण । झुंज न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) मालवणमधील (Malvan) राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पंरतु,एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात असून शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मालवणमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या वादळी वाऱ्यामुळेच राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण केले होते. नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली.तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची (Police) जादा कुमक मागविण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
ठाकरे गटाने दिला आंदोलनाचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, भारतात पुतळा पडल्याची कुठे घटना घडली नाही, मात्र सिंधुदुर्गात हा पुतळा पडला असल्याने या सरकारचे वाभाडे निघाले. याला जबाबदार असणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करा नाहीतर ठाकरे शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.