पुणे I झुंज न्यूज : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील आमरण उपोषण महिबुब सय्यद यांनी तिसऱ्या दिवशी मनसेच्या मागण्या मान्य झाल्याने मागे घेतले आहे. दिलेल्या निवेदनातील मुद्दयांच्या अनुषंगाने ०८ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले होते.
सदर निवेदनातील मुद्दयांच्या अनुषंगाने मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद यांच्या उपस्थितीत या जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता समक्ष चर्चा करण्यात आली होती. चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या विविध मुद्दयाबाबत मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद यांना विहीत कालावधीत कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये भंगार साहित्य विल्हेवाट प्रकरणी चौकशी समिती गठीत करुन त्यांचा अहवाल 30 दिवसात सादर करणे, शहरातील फुटपाथ वरील अतिक्रमणांवर कार्यवाही करणे, अनधिकृत बांधकांमाना नोटीस देऊन त्यावर कार्यवाही करणे, शहरातील घनकचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करणे इत्यादी मुद्दयांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणेकामी आदेशीत करण्यात आले आहे.
निवेदनातील मुद्दयांतील अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार असून आमरण उपोषण स्थगित करुन सहकार्य करावे, असे पत्र सहआयुक्त व नगरपरिषदेचे व्यंकटेश दुर्वास यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांना दिले आहे.उपोषणकर्ते सय्यद यांनी सांगितले, की जर एक महिन्याच्या आत मागण्या पूर्ण नाही झालं तर पुन्हा उपोषण करणार आहे.
हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहे. हे आंदोलन सोडविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष सुरक्षा रक्षक सेना व कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर, मनसेचे अंगरक्षक सरचिटणीस नितीन समुद्र, मनसेचे सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, सचिन कामेरकर, निखिल समुद्रे, मनसे जिल्हाध्यक्ष अँड. राजेंद्र गारुडकर, रविंद्र (बापु) सानप, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष अॅड. आदित्य मैड, मनसेचे सचिव रविंद्र लेंडे, शेख फक्कड, सलीमभाई शहा आदी उपस्थित होते.