खासदार अमोल कोल्हे यांचा राज्य सरकारला खोचक टोला
शिरूर I झुंज न्यूज : राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना आणून महिला भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली हि चांगली बाब आहे. परंतु त्याचबरोबर लाडक्या दाजीच्या दुधाला आणि शेतमालाला पण चांगला बाजार भाव द्यावा. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी असा खोचक टोला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लागवला.
लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिरूर शहरातील पंचायत वाडा या ठिकाणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा आज दिनांक ६ रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल तसेच आमदार अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ कोल्हे म्हणाले गुजरात मध्ये दुधाला चाळीस रुपये, केरळ मध्ये ४० रुपये तर कर्नाटक राज्यात दुधाला ३५ रुपये भाव आणि सरसकट पाच रुपये अनुदान आहे. मात्र महाराष्ट्रात मात्र दुधाला फक्त २५ ते २७ रुपये बाजार भाव आहे. कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिवाचं रान करून मला निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचेही यावेळेस कोल्हे म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्वतःच्या प्रचार सोबत डॉ अमोल कोल्हे यांच्यावर इतरही आठ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी होती. त्यामुळे कोल्हे यांना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु शिरूर तालुक्यातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झपाटल्यासारखं काम केलं. त्यामुळे डॉ कोल्हे यांना शिरूर तालुक्यात 28 हजार मतांची आघाडी मिळाली. तसेच ८५०० मत ही पिपाणी चिन्हाला मिळाली नाही तर मतांची आघाडी अजून वाढली असती.
उद्योगपती प्रकाश धारीवाल म्हणाले, आपल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या नावाच्या आधी ‘शिरूर’ हे नाव येत हे शिरूरच भाग्य आहे. माझे वडील उद्योजक रसिकलाल धारीवाल आणि रावसाहेब पवार यांचे घरगुती संबंध आहेत. तसेच माझा मुलगा आदित्य आणि अशोक पवारांचा मुलगा राज यांचेही घरगुती संबंध आहेत. आमच्या शिरूर शहरात अनेक बांधव झोपडीत राहतात. त्यांना पक्की घरे मिळावीत यासाठी डॉ कोल्हे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी धारीवाल यांनी केली.
यावेळी विश्वास ढमढेरे, बाळासाहेब नरके, पांडुरंग थोरात, मुज्जफर कुरेशी, शेखर पाचुंदकर, स्वप्निल गायकवाड, संजय देशमुख, सुजाता पवार, कामिनी बाफना, धरमचंद फुलफगर, संतोष भंडारी, चंद्रकांत बोरा, सुरेश पाचर्णे, निलेश खाबिया, संगिता शेवाळे, विद्या भुजबळ, स्मिता कवाद, राणी कर्डीले, गिता आढाव व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देशमुख तर सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.