लेखमाला ! आठवणीतील आगळ वेगळ व्यक्तीमत्व “हरिश्चंद्र महाडिक”

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468

“कर्जत चे दिलीप गडकरी यांनी रायगड जिल्हा वृत्त पत्र लेखक संघ स्थापन केला. मी त्यात सरचिटणीस होतो. रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील ठिकाणी शाखा स्थापन करण्यासाठी आम्ही तालुक्यांमधून संपर्क सुरू केला होता. माझ्या खोपोली येथील निवासस्थानी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला हरिश्चंद्र महाडिक उपस्थित होते. तो आमचा पहिला परिचय. ते संकोची, मितभाषी वाटले.

मुक्काम सुतार वाडी पोस्ट जामगाव तालुका रोहा येथील हरिश्चंद्र महाडिक यांचे नाव रायगड जिल्ह्यातील दैनिक रायगड टाईम्स, सागर, महानगरी टाईम्स चे अधिकृत पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. अचूक आणि मुद्देसूद वार्तांकन ते करतात.विविध घडामोडी यावर त्यांचे भाष्य असते. दुर्गम भागात काम करताना काय अडचणी, मर्यादा येतात हे त्यांना चांगलेच माहीत आहे.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते सदस्य आहेत. विविध कलाकारांचे कार्यक्रम ते विविध प्रसंगा निमित्ताने आयोजित करत असतात. त्यासाठी कलाकारांना योग्य मानधन ही ते देतात. त्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच, दैनिक कृषीवल चा उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांना तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देखील मिळाला आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सह्याद्री वाहिनीवरील आंबटगोड, स्वयंप्रभा मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी चे ते सदस्य आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांना आदिवासी मित्र पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र तैलिक महासंघ ,रायगड या संस्थेचे ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत.

आनंदनगरी हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मा. सुनिल तटकरे यांच्यावर लिहीलेला कोकण सम्राट ग्रंथ प्रसिद्ध आहे. विविध संस्थांचे जवळ पास ४० पुरस्कार विविध प्रकारच्या कार्यांसाठी त्यांना मिळाले आहेत. समर्थन या सेवाभावी संस्थेकडून पत्रकारिता साठी स्कॉलरशिप देखील त्यांना मिळाली आहे. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. दोघे डिप्लोमा इंजिनिअर आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न पिरंगुट येथे झाले. त्यानिमित्ताने ते पुण्यात येतात.त्यामुळे आमच्या भेटीचा पडलेला खंड संपेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *