– आमदार महेश लांडगे यांची मॅरेथॉन बैठक ; भोसरी मतदार संघातील विकासकामांचा आढावा
भोसरी I झुंज न्यूज : इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन येथे भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषित पाणी नदीमध्ये न मिसळण्यासाठी तळवडे, चिखली, डुडूळगाव, दिघी, सीएमई हद्दीत भोसरी येथे एकूण ९५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे प्रस्तावित आहे. यासह चऱ्होली येथे ४१ एमएलडी, कुदळवाडी येथे ३ एमएलडी काम पूर्ण झाले आहे. रिव्हर रेसिडेन्सी येथील १२ एमएलडी प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना केली.
विशेष म्हणजे, नदी प्रदूषणाबाबत सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांमध्ये प्रशासनाबाबत साशंकता निर्माण झाली असून, नदी प्रदूषणाची कारणे, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, किती नाले नदीला जावून मिळतात? त्यावर प्रशासन काय कार्यवाही करणार आहे? अशा विविध मुद्यांवर प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घ्यावी आणि पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासित करावे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
भूसंपादनासाठी पुन्हा कॅम्प घ्या : आमदार लांडगे
चिखली भागातील नव्याने प्रस्तावित ७ रस्त्यांचे काम सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा भूसंपादन कॅम्प घ्यावा. १०० टक्के भूसंपादनाची प्रशासनाने वाट पाहू नये. जसजशी जागा ताब्यात येईल, तसे रस्त्यांची कामे सुरू करावीत. तसेच, कॅम्पनुसार संबंधित बाधित जागा मालकांना तातडीने मोबदला द्यावा. यासह तळवडेमधील नदीच्या कडेने जाणारा रस्ता, तसेच चिखलीमधील शाईन सिटी समोरील ३० मीटर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. ज्यामुळे त्या भागातील वाहतुकीचा ताण कमी होईल त्रिवेणीनगर स्पाईन रस्ताबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करुन रस्ता विकसित करण्यात यावा. संबंधित बाधित नागरिकांना मोबदला दिला असून, अतिक्रमण हटवावे, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी बैठकीत दिल्या आहेत.
विविध प्रस्तावित प्रकल्पांना गती…
अण्णासाहेब मगर स्टेडिअमबाबत पीपीपी तत्वावर तातडीने निर्णय घेवून विषय मार्गी लावावा. मोशीमध्ये होणाऱ्या रुग्णालयाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा. या रुग्णालयामध्ये कॅन्सर हॉस्पिटलचाही समावेश करावा. प्रस्तावित अग्निशमन केंद्र उभारण्याकरिता जागा ताब्यात घ्याव्यात. दिघी येथील मदर ॲन्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारावे. चिखली येथील प्रस्तावित गोशाळेसाठी जागा ताब्यात घ्यावी. महावितरण उपकेंद्र, भोसरीतील ड्रेनेजलाईन भूमिगत करणे, डीपी रिव्हीजनबाबत बैठक अशा विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीला गती देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
“भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रस्तावित विकासकामांना गती देण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अडीच वर्षे प्रकल्पांची कामे रखडली होती. मात्र, महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रस्तावित प्रकल्पांना चालना मिळाली आहे. नदी प्रदूषणासह पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करीत आहोत. नियोजित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ‘कालबद्ध’ नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
– (महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा )