पुणे व मुंबईत सर्वाधिक तर, महाराष्ट्राबाहेर ६ आणि अमेरिकेत एक संमेलन…
पिंपरी I झुंज न्यूज : १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दिनांक ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकाराने संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या पूर्वीच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा घेतलेला हा आढावा.
मराठी रंगभूमी समृद्ध होत गेली. सुरवातीस प्रामुख्याने मुंबई, पुणे व नाशिक या महाराष्ट्राच्या पश्चिम भागात नाटक संस्कृती अधिक रुजली आणि वाढली. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी नाट्य संस्कृती पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भ, मराठवाडा, कोकण अशी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. महानगरपालिका व राज्य शासन यांच्या मदतीने विविध शहरात नाट्यगृहे उभी राहिली.
सन १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांच्यापासून मराठी नाट्य संस्कृतीचा प्रारंभ झाला, साऱ्या महाराष्ट्रात ही नाट्य संस्कृती फुलत गेली आणि त्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सन १९०५ मध्ये मुंबईत ग. श्री. खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री, संपादक, पत्रकार आणि नाट्यप्रेमी रसिक यांची उदंड गर्दी प्रत्येक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाला होत राहिली. आता सन २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण असे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होत आहे. ही बाब अभिमानास्पद आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे सन १९०५ पासून सुरु झाले. परंतु प्रत्येक वर्षी विविध अडचणींमुळे ते सलगपणे होऊ शकले नाही. विशेष म्हणजे १९०५ ते १९५५ या पहिल्या ५० वर्षात पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन मोठ्या शहरांमध्येच एकूण ४० संमेलने झाली. पुण्यात आत्तापर्यंत २२ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाली असून शताब्दी संमेलनही पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे होत आहे. पुण्याच्या या वाटचालीचा आढावा घेता लक्षात येते की १९०५ ते १९५५ या पहिल्या ५० वर्षात पुण्याने तब्बल २० अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची जबाबदारी उचलली. पण पुढे मात्र नंतरच्या ५० वर्षात १९६७ आणि १९७७ अशी दोनच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने पुण्यात झाली. याचाच अर्थ गेल्या ४६ वर्षात पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालेले नाही. ही उणीव आता पिंपरी-चिंचवड मधील नियोजित संमेलनामुळे भरून निघेल.
१९०५ पासून पहिल्या ५० वर्षात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पाठोपाठच्या वर्षी घेण्याची संधी देखील पुण्याला मिळाली. सन १९१३- १९१४ आणि सन १९३६ – १९३७ याबरोबरच सलग ३ वर्षे म्हणजे सन १९२७, १९२८ आणि १९२९ अशी सलग ३ वर्षे पुण्यात संमेलन झाली. याशिवाय, विक्रमी बाब म्हणजे सन १९१६ पासून सन १९२३ पर्यंत तब्बल सलग ८ वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यात आयोजले गेले. हा एक विक्रमच मानावा लागेल. तसेच पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला ती मिळालेली पावती आहे.
पुण्या प्रमाणे मुंबईने देखील तब्बल १३ वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन केले. त्यामध्ये, १९०५ मध्ये पहिले, १९११ मध्ये सातवे, १९१५ मध्ये अकरावे, १९३० मध्ये पंचविसावे, १९३३ मध्ये सहविसावे, १९४१ मध्ये बत्तीसावे, १९६३ मध्ये पंचेचाळीसावे, १९७१ मध्ये बावन्नवे, १९७३ मध्ये चोपन्नवे, १९८० मध्ये साठावे, १९९० मध्ये सत्तरावे, १९९३ मध्ये त्र्यहात्तरावे, २०१८ मध्ये अठ्ठ्याण्णववे असे एकूण १३ वेळा मुंबईने नाट्य संमेलनांचे आयोजन केले आहे.
नाशिकमध्ये १९०६ मध्ये दुसरे, १९०८ मध्ये चौथे, १९४० मध्ये एकतिसावे, १९८१ मध्ये एकसष्ठावे आणि १९९७ मध्ये सत्याहत्तरावे अशी संमेलने पार पडली. गेल्या १०० वर्षात ४ वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्याचा मान सांगली, कोल्हापूर आणि नागपूर यांना मिळाला. सांगलीमध्ये १९२४ मध्ये विसावे, १९४३ मध्ये तेहेतीसावे, १९८८ मध्ये एकोणसत्तरावे आणि २०१२ मध्ये ब्यान्नवावे संमेलन आयोजित केली गेली. कोल्हापूरमध्ये १९२६ मध्ये एकविसावे, १९४९ मध्ये छत्तीसावे, १९७० मध्ये एक्कावन्नवे आणि १९८३ मध्ये त्रेसष्ठवे संमेलन पार पडले. याशिवाय नागपूरमध्ये १९३९ मध्ये तिसावे, १९६२ मध्ये चव्वेचाळीसावे, १९८५ मध्ये पासष्ठवे आणि २०१९ मध्ये नव्याण्णववे संमेलन संपन्न झाले.
महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, सातारा, नांदेड, मालवण, बारामती आणि कणकवली येथे दोन वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. तसेच, महाराष्ट्राबाहेर नवी दिल्ली, बडोदे, बेळगाव आणि गोवा येथेही दोन वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झाले.
यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १९९९ मध्ये एकोणऐशीवे संमेलन झाले आणि सन २०२४ मध्ये प्रतिष्ठेचे १०० वे संमेलन आयोजित करण्याचा मानही पिंपरी चिंचवडला मिळाला. याशिवाय, अहमदनगरमध्ये १९४६ मध्ये पस्तिसावे,१९६४ मध्ये सेहेचाळीसावे आणि २००३ मध्ये त्र्याऐंशीवे, सोलापूरमध्ये १९५७ मध्ये एकोनचाळीसावे आणि २००८ मध्ये अठ्ठ्यांशीवे, साताऱ्यामध्ये १९५८ मध्ये चाळीसावे आणि १९९९० मध्ये एक्काहत्तरवे ,नांदेडमध्ये १९६५ मध्ये सत्तेचाळीसावे आणि २००६ मध्ये शहयांशीवावे , मालवणमध्ये १९९४ मध्ये चौऱ्याहत्तरवे आणि १९९५ मध्ये शहात्तरवे, बारामतीमध्ये १९९५ मध्ये पंच्याहत्तरावे आणि २०१३ मध्ये त्र्याण्णवावे आणि कणकवलीमध्ये १९९८ मध्ये अठ्यात्तरावे आणि २००७ मध्ये सत्याऐंशीवावे संमेलन पार पडले.
तसेच महाराष्ट्राबाहेर नवी दिल्लीमध्ये १९६१ मध्ये त्रेचाळीसावे आणि १९७६ मध्ये सत्तावन्नावे, बडोद्यामध्ये १९६० मध्ये बेचाळीसावे आणि १९७४ मध्ये पंचाव्वान्नवे, बेळगावमध्ये १९५६ मध्ये अडतिसावे आणि २०१५ मध्ये पंच्याण्णवावे आणि गोव्यामध्ये १९६८ मध्ये एकोणपन्नासावे आणि १९८४ मध्ये चौसष्ठावे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या १०० वर्षात एकदा संमेलन आयोजित करण्याचा मान अनेक शहरांना मिळाला. त्यात महाराष्ट्राबाहेरील हैद्राबादमध्ये १९५९ मध्ये एक्केचाळीसावे, ग्वाल्हेरमध्ये १९६९ मध्ये पन्नासावे आणि इंदूरमध्ये १९८७ मध्ये अडूसष्ठावे संमेलन पार पडले. सात समुद्रापलीकडे हे संमेलन आयोजित करण्याचा मान अमेरिकेतील न्यू जर्सीने पटकावला. तेथे न्यू जर्सीमध्ये २०१० मध्ये नव्वदावे संमेलन पार पडले आणि संमेलनाच्या आयोजनात मानाचा तुरा रोवला गेला.
या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अमरावतीमध्ये १९१२ मध्ये आठवे, जळगावमध्ये १९४४ मध्ये चौतिसावे, कल्याणमध्ये १९७२ मध्ये त्रेपन्नावे, यवतमाळमध्ये १९७५ मध्ये छपन्नावे, सावंतवाडीमध्ये १९७८ मध्ये एकोणसाठावे, अकोल्यामध्ये ८२ मध्ये बासष्ठावे, पुसदमध्ये १९८६ मध्ये सहासष्ठावे, इचलकरंजीमध्ये १९८६ मध्ये सदुसष्ठावे, वाशीमध्ये १९९१ मध्ये बहात्तरावे, परभणीमध्ये २००० मध्ये ऐंशीवे, रोहामध्ये (रायगड) २००१ मध्ये एक्क्यांशीवे, वसईमध्ये २००२ मध्ये ब्याऐंशीवे, कऱ्हाडमध्ये २००४ मध्ये चौऱ्याऐंशीवे, डोंबिवलीमध्ये २००५ मध्ये पंच्याऐंशीवे, बीडमध्ये २००९ मध्ये एकोणनव्वदावे, रत्नागिरीमध्ये २०११ मध्ये एक्क्याण्णववे, पंढरपूरमध्ये २०१४ मध्ये चौऱ्याण्णवावे, ठाणेमध्ये २०१६ मध्ये शह्याण्णवावे आणि उस्मानाबादमध्ये २०१७ मध्ये सत्याण्णवावे अशी संमेलने पार पडली.
या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक नामवंतांनी संमेलन अध्यक्ष पद भूषवले. यामध्ये, न.चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, शि. म. परांजपे, रेव्हरंड ना. वा. टिळक, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर, बाबासाहेब घोरपडे, दादासाहेब फाळके, बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस, गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, आचार्य अत्रे (२ वेळा), वि. दा. सावरकर, चिंतामणराव कोल्हटकर, माधवराव पटवर्धन, वि. स. खांडेकर, वसंत देसाई, दुर्गा खोटे, अनंत काणेकर, पु. भा. भावे, पु. ल. देशपांडे, मो. ग. रांगणेकर, ग. दि. माडगूळकर, वसंत कानेटकर, वि.वा. शिरवाडकर, विद्याधर गोखले, भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भालबा केळकर, छोटा गंधर्व, आत्माराम भेंडे, वसंतराव देशपांडे, रणजित देसाई, ज्योत्स्ना भोळे, प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, चित्तरंजन कोल्हटकर, शाहीर साबळे, माधव मनोहर, शरद तळवलकर , वसंत सबनीस, आत्माराम सावंत, राजा गोसावी, जितेंद्र अभिषेकी, नाना पाटेकर, भक्ती बर्वे, सुरेश खरे, लालन सारंग, रमेश देव, रामदास कामत, मोहन जोशी, श्रीकांत मोघे, डॉ. मोहन आगाशे, फय्याज, कीर्ती शिलेदार, प्रेमानंद गज्वी, डॉ. जब्बार पटेल अशा अनेक नामवंतांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाची उंची वाढवली.
अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या १०० वर्षाच्या इतिहासात माय आणि लेक अशा दोघींनी अध्यक्षपद भूषवण्याचा दुर्मिळ योग दिसून येतो. अहमदनगर येथे झालेल्या ८३ व्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाट्य संगीत गायिका जयमाला शिलेदार यांनी भूषविले. त्यांची कन्या कीर्ती शिलेदार यांनी २०१८ मध्ये मुलुंड, मुंबई येथे झालेल्या ९८ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून हा दुर्मिळ योग घडवून आणला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला या शताब्दी वर्षामुळे नवचैतन्य लाभले आहे.
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पिंपरी चिंचवड येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.