– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन
– क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धोरणानुसार खेळाडू दत्तक योजनेची कार्यवाही सुरू करून चालू आर्थिक वर्षात खेळाडुंना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यानुसार शहरातील गुणवंत खेळाडूंना साडे तीन हजार ते साडे पाच हजार रुपयांपर्यंत वार्षिक क्रीडा शिष्यवृत्तीचा हातभार लावला जाणार आहे. 2022-23 या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती 2023-24 मध्ये पात्र विद्यार्थी खेळाडूंना देण्यात येणार आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना वार्षिक 3 हजार 300 रुपये मिळणार आहेत. तर राष्ट्रीय शालेय स्पर्धात (नॅशनल स्कूल गेम / स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) तर्फे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना 5 हजार 500 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘स्पोर्ट्स सिटी’ व्हावी. या करिता आम्ही प्रयत्नशील आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय स्टेडिअम असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे स्थानिक खेळाडुंना हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. शहरातील गुणवंत खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे. या करिता सुरू केलेल्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आहे. महापालिका प्रशासन त्यादृष्टीने कार्यवाही करेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.