पिंपरी I झुंज न्यूज : भक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या छटपुजा उत्सवानिमित्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९)सायंकाळी पाच वाजता ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवणाऱ्या विश्व श्रीराम सेना या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेश पांडे, आमदार महेशदादा लांडगे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबीकलाल गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे.
निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लालबाबु गुप्ता यांनी केले आहे.