शिल्पांच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती, पारंपरिक खेळांची जनजागृती…

– आमदार महेश लांडगे यांची विधायक संकल्पना
– भोसरीत कुस्ती केंद्र, गावजत्रा मैदान परिसराचे सुशोभिकरण

पिंपरी । झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदार संघातील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ७ येथील भोसरी स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी संकूल उभारण्यात आले आहे. तसेच, भोसरी स्मशानभूमीचेही नूतनीकरण यापूर्वीच झाले आहे.

विशेष म्हणजे, या भागात भारतीय संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेला परंपरागत बैलगाडा घाट आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी आमदार लांडगे यांनी सर्वोच्च न्यालयात यशस्वी लढा दिला. त्यानंतर राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या.

ई- क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र बोरावके म्हणाले की, महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत यासह कुस्तीसारख्या मर्दानी खेळाबाबत नव्या पिढीत जनजागृती व्हावी. आपली शेती-माती आणि संस्कृतीबाबत अभिमान निर्माण व्हावा. या करिता या रस्त्याच्या सुशोभिकरणात विविध शिल्प उभारण्याची सूचना करण्यात आली होती. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

“महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत, कुस्ती, कबड्डी, योगमुद्रा अशा विविध शिल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती आणि विधायक संदेश जाईल. या संकल्पनेतून भोसरी गावजत्रा मैदान परिसर, तसेच स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे काम करताना सुशोभिकरण करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आपली संस्कृती, लाल मातीतील आपले खेळ याबाबत प्रत्येकाला अभिमान पाहिजे.
– (महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.)

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *