आयटीनगरी हिंजवडीत प्रथमच महाकाल कावड यात्रा…

श्रावणी सोमवार निमित्त नागेश साखरे यांचे आयोजन

हिंजवडी I झुंज न्यूज : दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आयटीनगरी हिंजवडीमध्ये महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सोमवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हिंजवडीतील वडजाईनगर ते माण मधील प्राचीन मोरया महादेव मंदिर, अशी भव्य-दिव्य कावड यात्रा निघणार आहे.

पारंपारिक वाद्यांच्या गजरात तसेच नगारा, शंखनाद आणि बम बम भोलेच्या जय घोषात विविध ठीकाणचे तपस्वी, साधू संत आणि पंचक्रोशीतील शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रा संपन्न होणार आहे.

माण गावच्या वेशीवर या कावड यात्रेचे माण ग्रामस्थांकडून जंगी स्वागत केले जाणार आहे. यासाठी येथील मोरया महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीने सुद्धा आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. आयटीनगरीत प्रथमच श्रावण महिन्यात महाकाल कावड यात्रेचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आल्याने शिवभक्त आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. धर्म भावना जागृत व्हावी, देव देवतांचे महात्म्य पुढील पिढीला समजावे, एकोपा टिकून राहावा यासाठी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी शिवभक्त नागेश साखरे यांनी पुढाकार घेतला असून, हिंजवडी ग्रामस्थं आणि पंचक्रोशीतील तमाम शिवभक्त कावड यात्रेचे नियोजन करणार आहेत. परिसरातील अनेक संघटना, शिवप्रेमी ग्रुप, सार्वजनिक मंडळं यांनी कावड यात्रेस आपला पाठिंबा दर्शविल्याने शिवभक्तांची मोठी गर्दी हिंजवडी-माण रस्त्यावर सोमवारी पहायला मिळणार आहे.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *