अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट…

आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी

मुंबई I झुंज न्यूज : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मुंबईतील अकरा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन केली . या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसरया दिवशी गुंडाकरवी मारहाण केली याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला.. आज मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.. यावर या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिले.

यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *