पुणे I झुंज न्यूज : पुणे जिल्हयातील सर्व सेवारत व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी/विधवा, वीरमाता/वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिक यांच्यासाठी शनिवार दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या तहसिल कार्यालयामध्ये तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांर्तगत सैनिकांना व त्यांच्या कुटूंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले/प्रमाणपत्रे, तसेच घर/शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेल्या समस्या/प्रश्नांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहिद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना व शौर्य पदक धारकांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असणाऱ्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.
तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांना घरासाठी/शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील. तरी आपल्या असलेल्या समस्याबाबत लेखी अर्जासह आपण संबंधित तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त आजी/माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांनी या संधीचा लाभ घ्यावा.