“ध्येयवेड्यांची यशोगाथा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
पिंपरी I झुंज न्यूज : भारताची लोकशाही फक्त एका माणसावर आणि एका न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे की काय असे वाटते. राजकारणाचं दिवाळं निघालं आणि समाजकारणाचं वाटोळं झालं. संस्कृतीचा बट्ट्याबोळ झालेल्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा वीर पुरुष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे ज्या खेड तालुक्यातील पुर गावचे आहेत त्याच गावाचे हे ध्येयवेडे. त्या गावाच्या परंपरेचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
“ध्येयवेड्यांची यशोगाथा” या दादाभाऊ गावडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि.९) पिंपरी येथे डॉ. सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेटेड अफेअर्स हाय कोर्ट मुंबई, नागपूर बेंचचे एस. डी. पाटील, मुंबईचे नागरी पुरवठा संचालक व नियंत्रक कान्होराज बगाटे, वेदांत प्रकाशनच्या सुप्रिया कुलकर्णी, निवृत्त शिक्षक पांडुरंग गाडीलकर, पिंपरी चिंचवडचे उद्योजक रामदास माने, स्री रोग तज्ञ डॉ. शिवाजी खैरे, डॉ. सूर्यकांत काटे, गावडे ग्रीन पॉवरचे संचालक दीपक गावडे, हिंदुस्तान पेट्रोलियमचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक मारुती डोंगरे, मिगा फॅशन इन्स्टिट्यूटचे संचालक बाळासाहेब गावडे, सेवानिवृत्त वनाधिकारी संतोष गावडे आदी उपस्थित होते. यावेळी निवृत्त शिक्षक पांडुरंग गाडीलकर, लेखक दादाभाऊ गावडे आणि या पुस्तकात समावेश असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या पत्नींचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सबनीस म्हणाले की, पुढाऱ्यांचे, राजकीय नेत्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे उमाळे, हुंदके हे नाटकी असतात. प्रशासकीय अधिकारी करंटे असतात, कलंकित असतात. पण डोळस दृष्टिकोन ठेवणारा चंद्रकांत दळवी सारखा माणूस याला अपवाद आहेत. शून्यातून जीवन कसे घडवावे जीवनातील लढाई यशस्वी कशी करावी हे या पुस्तकातून पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. तुम्ही कष्ट करून उभारलेली श्रीमंती कष्ट न करता उपभोगण्याचे काम जर तुमची दुसरी, तिसरी पिढी करणार असेल तर सावधान राहण्याचा इशारा डॉ. सबनीस यांनी यावेळी दिला.
चंद्रकांत दळवी म्हणाले की, यशाचा पाठलाग करीत असताना येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत पुढेच गेले पाहिजे. संधी प्रत्येकाला मिळते पण त्या संधीचे सोने करणारे निवडक असतात. आगामी पंधरा-वीस वर्षात देशातील पाच हजार शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील. पण देशातील लाखो गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत त्यासाठी गावातून शहरात उद्योग, व्यवसायासाठी गेलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन गावाचा विकास करण्यासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी “अढळगाव” चे मॉडेल देशात रोल मॉडेल ठरत आहे. नवरे लोक बायकोचे शहाणपण मान्य करीत नाहीत. परंतु या पुस्तकातील सर्वांनी आपल्या पत्नीचे मोठेपण मान्य केले आहे. या पुस्तकात प्रामाणिकपणा आहे. सर्व यशस्वी व्यक्ती मागे त्यांच्या पत्नीचा त्याग, कष्ट असते त्याच खऱ्या सत्काराच्या सन्मानाच्या पात्रतेच्या आहेत असेही चंद्रकांत दळवी म्हणाले.
यावेळी पुस्तकात समावेश असणाऱ्या सातही व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्तावित करताना लेखक दादाभाऊ गावडे यांनी पुस्तकातील सातही व्यक्ती विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले, आभार मारुतराव डोंगरे यांनी मानले.