“महाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून ओळखली जाते, सबंध विश्वभर पसरलेला भगवद प्राप्तीच्या अन्य पथांवर चालणारे अनेक पथिक समाजास प्रबोधन करत राहिले आहेत. अगदीच साध्या भाषेत सांगायचे म्हणजे सर्व अध्यात्म जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे एवढ्याश्या महाराष्ट्रात झाले हे विशेष. श्री विष्णु नरसिंह जोग महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे ते संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि राष्ट्रीय कार्यात यथाशक्ती मदत करीत.
विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला, आईचे नाव सरस्वती. तीन मोठे भाऊ, त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबा महाराजांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीवरील माळ स्वतःच गळ्यात घालून घेतली आणि ते वारकरी झाले.
विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तने करू लागले. कीर्तन-प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांनी मराठी संतवाङ्मयातील अनेक ग्रंथ टिपा- प्रस्तावना- अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने दिली. आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले त्यात जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटले आहे. भजने, ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला.
विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.
जोगमहाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ, साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष- उत्तरपक्षाची जोड दिली, त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शं.वा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक.
कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीला, वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली. तुकारामांच्या अभंगांचा अर्थ लावून सार्थ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले.
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकोबांची गाथा इत्यादी उच्च अध्यात्मिक अनुभवांनी समृद्ध ग्रंथावर महाराजांनी एवढे प्रभुत्व मिळविले होते, की त्यांच्या प्रवचनांस ह.भ.प. पांगारकरांसारखे विद्वान लोकदेखील आवर्जून उपस्थित रहायचे.
महाराजांच्या चरित्रांतील एक अलौकिक भाग असा, की स्वतः बोधसंपन्न होऊन आपणांस प्राप्त झालेला हा बोध, हा साधुसंतांचा संदेश त्यांनी मुक्तहस्ताने जे जे त्यांच्याकडे शिकायला येत, त्यांना त्यांना शिकविला. जाहीर प्रवचने, किर्तने करुन आणि ग्रंथ लिहून जगाला दिला. संतांच्या निरोपाप्रमाणे ते स्वतः जन्मभर वागले .
जरी महाराज नैष्ठिक ब्रम्हचारी, तरी खुशाल त्यांना जगाचे ‘वडील’ म्हणावे !
महाराजांनी आळंदी येथे जी वारकरी शिक्षणसंस्था स्थापन केली होती, तिला प्रापंचिक व्यापामध्ये आपल्या वाट्यास आलेला पंचवीस हजार रुपयांचा हुकूमनामा देणगी म्हणुन देऊन टाकला ! महाराजांचा नेहमीच आग्रह असे, की भीक मागणारा आशाबद्ध वक्ता यथार्थ मार्गदर्शन करु शकत नाही !
महाराज जबरदस्त सोशीक होते. त्यांना भगेंद्राचे दुखणे झालेले असतानाही त्यांची पंढरपुरची वारी आणि तिथली किर्तने चुकली नाहीत. त्या काळी बार्शी लाईट रेल्वेचा दगदगीचा प्रवास, पण त्यालाही ते जुमानीत नसत. महाराजांना शेवटचे दुखणे झाले कफक्षयाचे. ह्या तापाने त्यांना फारच छळले, पण आजारांतही ते आत्मविश्वासाने म्हणत “आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरणारच नाही”.
महाराजांचे ज्ञानेश्वर माउलींवर अनन्यसाधारण- किंबहुना देवापेक्षांही अधिक प्रेम ! त्यामुळे आपला देह आळंदीस ज्ञानेश्वरांजवळ पडावा, अशी त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते.
१९२० सालची माघ शुद्ध दशमी जवळ आली. महाराज आळंदीला जायच्या गोष्टी बोलू लागले. पौर्णिमा उजाडली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे सोडण्याचा महाराजांचा निश्चय जाहीर झाला. दोन घोड्यांच्या गाडीतून त्यांना आळंदीला नेण्यांत आले.
महाराज त्यांच्या वारकरी शिक्षणसंस्थेत उतरले. इंद्रायणीचे व ज्ञानेश्वर महाराजांचे तीर्थ त्यांना आणून दिले तोपर्यंत साडेआठ वाजून गेले. मग महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना बसविण्यात आल्यावर ते उत्तरेकडे तोंड करुन बसले – आणि म्हणाले, ‘जातो– ‘ त्यांनी देह ठेवला, श्री क्षेत्र आळंदीत – त्यांच्या प्रिय उपास्यदैवताशेजारी, गुरुवारी, उत्तरायणांत, माघ वद्य प्रतिपदा म्हणजे गुरूप्रतिपदा, सकाळी नऊ वाजतां. गीतेत योग्यांच्या मरणाला जी शुभ वेळ सांगितली आहे, ती नेमकी त्यांनी साधली. तेही मरण कसे ! तर ते म्हणत त्याप्रमाणे
“झाकिलिये घटीचा दिवा कुणाला न जानवतां मालवावा” तसे !
ह्या महान ज्ञानेश्वरभक्ताच्या जीवनाची इतिश्री ही अशी भाग्याची झाली !!
🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या….!
ll जय जय राम कृष्ण हरी ll 🚩
संदर्भ : सोशल मीडिया