पिंपरी – चिंचवड ते चाकूर “पत्रकार एकता रॅली” निघणार – एस.एम देशमुख

लातूर I झुंज न्यूज : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ५ मार्च २०२३ रोजी संपन्न होत असल्याची घोषणा एस.एम देशमुख यांनी केली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणारया तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात.. यावर्षी हा सोहळा चाकूर येथे होत आहे.

दि.५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा सुरू होईल. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावं यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.. भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके हे कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष असतील.

चाकूर मेळाव्याच्या निमित्तानं पिंपरी – चिंचवड ते चाकूर अशी पत्रकार एकता रॅली काढली जाणार आहे. ही रॅली ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी – चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघेल.. ती पिंपरी चिंचवड, पुणे, रांजणगाव, शिरूर, पारनेर, नगर, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा मार्गे रात्री बीडला पोहचेल. रॅलीचा मुक्काम बीड येथे असेल.. रॅली ४ मार्च रोजी सकाळी चौसाळा येथे जाईल.. तेथून केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर मार्गे चाकूरला जाईल. चाकूर मध्ये मिरवणूक काढली जाईल. रॅली ज्या ज्या शहरातून जाईल तेथील पत्रकार आणि लोकप्रतिनिधी रॅलीचं गावच्या वेशीवर स्वागत करतील.

रॅलीत एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, मन्सूरभाई, विजय जोशी तसेच परिषदेचे अन्य पदाधिकारी असतील.. ज्या गावातून रॅली जाईल तेथील तालुका, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य रॅलीत सहभागी होतील.. रॅली आपल्या गावात किती वाजता पोहचेल हे दोन दिवस अगोदर कळविले जाईल. गाडीवर एक स्टीकर असेल, परिषदेचा ध्वज गाडीवर असेल… रॅलीत किमान ५० गाड्या असाव्यात यादृष्टीने नियोजन केले जात आहे.. रॅली आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी टीम चाकूर जोरदार प्रयत्न करीत आहे..या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान ६०० प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.तसे नियोजन स्थानिक संयोजन समिती करीत आहे.

यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे –
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा,अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग: पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

       

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *