भविष्यात कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता ; खासगी रूग्णालये ताब्यात घेवून आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता वाढवा – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसाला १ हजार ते १२०० नवीन रूग्ण सापडत आहेत. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रूग्णांना बेड मिळत नाहीत. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेडअभावी रूग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी खासगी रूग्णालये ताब्यात घेऊन आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता वाढवावी. त्यांना वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे. काही खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची लूट केली जात आहे. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा. नागरिकांना त्यातून दिलासा द्यावा असेही त्यांनी सांगितले.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सोैरभ राव यांना पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही खासगी रूग्णलयात बेड उपलब्ध होत नाहीत. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत अशी गंभीर परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडे दररोज येत आहे. या रूग्णालयातून त्या रूग्णालयात अशी रूग्णांची फरफट होत आहे. त्यामुळे रूग्ण दगावण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे.

पालिका, राज्य सरकारने उभारलेले कोविड सेंटर देखील फुल झाले आहेत. सेंटरमध्ये देखील जागा उपलब्ध होत नाही. शहराच्या आजूबाजूला मावळ, खेड, चाकण, जुन्नर, आंबेगाव मधून अनेक रूग्ण शहरात येतात. त्यामुळे हालत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पालिकेने जास्तीत जास्त खासगी रूग्णालयावर नियंत्रण ठेवावे. बेड उपलब्ध करून द्यावेत. शहरात आजदेखील बऱ्याच ओपीडी बंद आहेत. त्यामुळे अनेक डाॅक्टर उपलब्ध होतील. खासगी प्राॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरसोबत काॅन्फरन्स घ्यावी. त्यांना कोविड सेंटर, खासगी रूग्णालयात उपलब्ध करून घ्यावे. खासगी रूग्णालयांना डाॅक्टर, परिचारिका हा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा. यासाठी देखील पालिकेने प्रयत्न केले पाहिजेत.

“आज परिस्थिती भयानक आहे. यापेक्षा आणखी परिस्थिती वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या बरीच ठिकाणी आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. बेड उपलब्धतेसाठी पुण्यातील देखील अनेक रूग्णालयांना मी फोन करतो. पण, कोठेही तत्काळ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. अशी अवस्था आहे. त्यामुळे रूग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोविड बाधित रूग्णांचे कुटूंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली जात आहेत.”

खासगी रूग्णांलयांचे दर जास्त आहेत. काही रूग्णालये कोरोना रूग्णाकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी करतात. लूट होतेय, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यावेळेस खासगी रूग्णालयावर पालिकेचे नियंत्रण असावे हा मुद्दा मी वेळोवेळी उपस्थित केला होता. बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि त्या तक्रारींचे निरोरण करावे. कक्ष करावा. नागरिकांना त्यातून दिलासा द्यावा, असेही खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *